हॉलीवूड अभिनेता Johnny Depp ने घेतला भारतीय रेस्टॉरंट 'वाराणसी'मध्ये भोजनाचा आस्वाद; तब्बल 49 लाखांचे झाले बिल (Watch Video)

जॉनीनी आपल्या मित्रांसोबत बर्मिंगहॅममधील वाराणसी रेस्टॉरंटमध्ये (Varanasi Restaurant) करीचा आस्वाद घेतला.

Johnny Depp (संग्रहित संपादित प्रतिमा)

हॉलीवूडसह संपूर्ण मनोरंजन विश्वाचे लक्ष लागून राहिलेल्या जॉनी डेप (Johnny Depp) आणि अंबर हर्ड यांच्या बदनामीचा खटला नुकताच संपला. याबाबत फेअरफॅक्स, व्हर्जिनिया येथे सहा आठवड्यांची ट्रायल पार पडली आणि शेवटी डेपने 15 दशलक्ष डॉलर्सचा हा खटला जिंकला. त्यानंतर, अभिनेत्याला यूकेमध्ये गिटारवादक जेफ बेकसोबत अनेक कार्यक्रमांमध्ये पाहिले गेले. नुकतेच दोघेही इंग्लंडमध्ये एका म्युझिक टूर दरम्यान एकत्र दिसले होते. यासह दोघेही बर्मिंघममधील भारतीय रेस्टॉरंटमध्ये त्यांच्या इतर काही मित्रांसह एकत्र जेवतानाही दिसले.

तर सांगायची गोष्ट अशी की, या रेस्टॉरंटमध्ये जॉनीने लाखो रुपयांच्या भोजनाचा आस्वाद घेतला आणि तिथून बाहेर पडताना तिथल्या स्टाफला लाखो रुपयांची टीपही दिली आहे. जॉनीनी आपल्या मित्रांसोबत बर्मिंगहॅममधील वाराणसी रेस्टॉरंटमध्ये (Varanasi Restaurant) करीचा आस्वाद घेतला. डेली मेलच्या म्हणण्यानुसार या भोजनासाठी £50,000 (जवळपास 49 लाख रुपये) खर्च झाले. अहवालानुसार, त्यांनी भारतीय पदार्थ, कॉकटेल आणि रोज शॅम्पेनचा आनंद लुटला. तसेच बटर चिकन, पनीर टिक्का, लँब कढई, किंग प्रॉन भुना, नान, भात आणि कोशिंबीरही ऑर्डर केली होती.

वाराणसी रेस्टॉरंटच्या प्रवक्त्याने सांगितले की, जॉनी डेप आणि जेफ बेक यांना रात्रीच्या जेवणासाठी होस्ट करणे हा 'निरपेक्ष आनंद' होता. त्यांच्या टीमसाठी हा ‘आयुष्यातील खास अनुभव’ होता. वाराणसी येथील ऑपरेशन डायरेक्टर मो हुसेन म्हणाले, ‘जॉनी डेप आणि त्यांची टीम आम्ही त्यांना दिलेले जेवण पाहून खूप आनंदित झाले. त्यांना आमचे जेवण इतके आवडले की हॉटेलवर परत जाताना देखील ते काही पदार्थ सोबत घेऊन गेले. डेपने कर्मचारी सदस्य, आमचे मित्र आणि रेस्टॉरंटच्या मालकाच्या कुटुंबासोबत खूप छान वेळ व्यतीत केला. तो सर्वांना भेटला मिठी मारली, खूप फोटो काढले. तो अतिशय नम्र होता.’ (हेही वाचा:  जॉनी डेपने माजी पत्नी एम्बर हर्ड विरुद्ध मानहानीचा खटला जिंकला, हर्डला $15 दशलक्ष नुकसान भरपाई देण्याचे आदेश)

रिपोर्टनुसार, जॉनी डेप आपल्या सहकाऱ्यांसोबत रविवारी संध्याकाळी 7 वाजता बर्मिंघमच्या लोकप्रिय 'वाराणसी' रेस्टॉरंटमध्ये पोहोचला. या वेळी हे रेस्टॉरंट इतर कोणत्याही सामान्य व्यक्तीसाठी बंद ठेवण्यात आले होते. जॉनी डेप आणि त्याचे मित्र तिथून मध्यरात्रीनंतर निघून गेले.