मनोरंजन विश्वात Barack Obama यांची धमाकेदार एन्ट्री; नेटफ्लिक्स सिरीजसाठी मिळाला प्रतिष्ठेचा Emmy पुरस्कार

यानंतर त्यांनी एक ना-नफा संस्था स्थापन केली असून त्याअंतर्गत एक उत्पादन कंपनी स्थापन केली आहे.

Former USA President Barack Obama. (Photo Credit: Getty)

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांची हॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री झाली आहे. नोबेल शांतता पुरस्कारासह जवळपास सर्वच मोठे पुरस्कार मिळालेले बराक ओबामा यांनी आता हॉलिवूडच्या एका मोठ्या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. बराक ओबामा यांना दूरचित्रवाणी जगतातील प्रतिष्ठेचा एमी पुरस्कार (Emmy Award) प्राप्त झाला आहे. शनिवारी, टेलिव्हिजन अकादमीने बराक ओबामा यांना त्यांच्या नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरी मालिकेतील अवर ग्रेट नॅशनल पार्क्समधील (Our Great National Parks) कथनासाठी एमी पुरस्काराने सन्मानित केले.

अमेरिकेचे दोन वेळा राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या जगातील लोकप्रिय नेत्यांपैकी एक बराक ओबामा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. त्यांना दोनदा ग्रॅमी हा संगीत जगतातील सर्वात मोठा पुरस्कारही मिळाला आहे. आता त्यांना एमी हा टेलिव्हिजन जगतातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे. अशाप्रकारे मनोरंजन विश्वातील चार प्रतिष्ठेच्या पुरस्कारांपैकी दोन पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. इतर दोन पुरस्कारांमध्ये ऑस्कर आणि टोनी यांचा समावेश आहे.

या चार पुरस्कारांना EGOT म्हणतात. म्हणजेच चारही पुरस्कार मिळवण्याची कामगिरी. एंटरटेनमेंट वीकली ट्रॅकरच्या मते, मेल ब्रूक्स, हूपी गोल्डबर्ग, ऑड्रे हेपबर्न आणि अलीकडे जेनिफर हडसन यांच्यासह केवळ 17 लोकांनी EGOT हे चारही पुरस्कार प्राप्त केले आहेत. याआधी अमेरिकेच्या आणखी एका राष्ट्राध्यक्षांना 1956 मध्ये एमी मिळाला आहे. मात्र, तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डी. आयझेनहॉवर यांना मानद एमी पुरस्कार देण्यात आला होता. (हेही वाचा: Justin Bieber India Show: दिल्लीत 18 ऑक्टोबर रोजी परफॉर्म करणार जस्टिन बीबर; जाणून कुठे बुक कराल तिकिटे व दर)

2017 मध्ये पद सोडल्यापासून, ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल या दोघांनीही स्वतःचे संस्मरण लिहिले आहे आणि दोन्ही संस्मरण सर्वाधिक विकल्या गेलेल्या संस्मरणांपैकी एक आहेत. यानंतर त्यांनी एक ना-नफा संस्था स्थापन केली असून त्याअंतर्गत एक उत्पादन कंपनी स्थापन केली आहे. असे सांगितले जात आहे की या कंपनीने नेटफ्लिक्ससोबत 10 दशलक्ष डॉलर्सचा मोठा करार केला आहे. त्यांच्या कंपनीचा पहिला डॉक्युमेंटरी चित्रपट, ‘अमेरिकन फॅक्टरी’ने सर्वोत्कृष्ट माहितीपट श्रेणीमध्ये ऑस्कर आणि दिग्दर्शनासाठी एमी जिंकले.