Coronavirus Outbreak: अभिनेते रजनीकांत यांच्याकडून FEFSI मधील कामगारांना 50 लाख रुपयांची मदत

तसेच चित्रपटसृष्टीतील शूटिंग सुद्धा रद्द करण्यात आले आहेत. याच पार्श्वभुमीवर साउथ सुपरस्टार रजनीकांत यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

सुपरस्टार रजनीकांत (Photo Credits-ANI)

देशभरात थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसमुळे अनेकांचे लाखो-करोडोचे नुकसान होत आहे. तसेच चित्रपटसृष्टीतील शूटिंग सुद्धा रद्द करण्यात आले आहेत. याच पार्श्वभुमीवर साउथ सुपरस्टार रजनीकांत यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. रजनीकांत यांनी वर्कर्ससाठी 50 लाख रुपयांचा मदत निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम फिल्म फेडरेशन ऑफ साउथ इंडिया युनियन वर्कर्स यांना देण्यात येणार आहे.कोरोना व्हायरसमुळे चित्रपट आणि टीव्ही मालिकांना फटका बसला असून त्यांचे शूटिंग्स पुढील काही दिवसांसाठी रद्द करण्यात आले आहेत.

हातावर पोट भरणाऱ्यांसाठीचे दैनंदिन जीवन सुरळीत सुरु राहण्यासाठी रजनीकांत पुढे आले आहेत. कारण अशा लोकांचे सध्या कोरोनाच्या परिस्थितीत खाण्यापिण्याचे खुप हाल होत असल्याने रजनीकांत यांनी त्यांच्यासाठी 50 लाख रुपये मदत करणार असल्याचे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सर्वांनी एकमेकांच्या मदतीसाठी पुढे येण्यासाठी आवाहन नागरिकांना केले होते. त्यांनी कर्मचाऱ्यांचे पगार कापू नये असे अपील केले होते.(दाक्षिणात्य सुपरस्टार रजनिकांत यांचा ‘जनता कर्फ्यू’ संदर्भातील व्हिडिओ ट्विटरने केला डिलिट)

रजनीकांत यांनी मदतीचा हात पुढे केल्यानंतर आता अन्य दिग्गज कलाकार मंडळी सुद्धा गरिबांना मदत करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. दरम्यान, जगभरात कोरोना व्हायरसमुळे 16 हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. लाखो जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर भारतात आतापर्यंत 400 पेक्षा अधिक जणांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. कोरोनासंबंधित प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक आहे.