Yo Yo Honey Singh च्या विरुद्ध पत्नीने दाखल केला घरगुती हिंसाचाराचा गुन्हा; पतीवर मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप

हनी सिंगच्या पत्नीने दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात हा खटला दाखल केला आहे

Honey Singh (Photo Credits: Getty Images)

रॅपर आणि गायक 'यो यो हनी सिंह' (Yo Yo Honey Singh) अर्थात हृदेश सिंह याच्याविरुद्ध त्याची पत्नी शालिनी तलवारने (Shalini Talwar) घरगुती हिंसाचाराचा (Domestic Violence) गुन्हा दाखल केला आहे. हनी सिंगच्या पत्नीने दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात हा खटला दाखल केला आहे. शालिनीने तिच्या पतीवर शारीरिक आणि मानसिक हिंसाचाराचा आरोप केला आहे. शालिनीने आज तिचा खटला न्यायालयात दाखल केला. न्यायालयाने हनी सिंगला 28 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्याची नोटीस बजावली आहे. हनी सिंह आणि शालिनी यांचे लग्न 2011 मध्ये दिल्लीतील गुरुद्वारामध्ये झाले होते.

आता पत्नीने दाखल केलेल्या खटल्यात असे म्हटले आहे की, तिला मारहाण केली जात आहे आणि तिचे मानसिक शोषणही केले जात आहे. हनी सिंगची पत्नी शालिनीच्या वतीने वकील संदीप कौर, अपूर्व पांडे आणि जीजी कश्यप न्यायालयात हजर होते. शालिनीने हनी सिंगसह त्याचे आई-वडिल आणि बहिणीवरही शारीरिक हिंसा, लैंगिक हिंसा, मानसिक छळ आणि आर्थिक हिंसाचाराचा आरोप केला आहे. शालिनीने न्यायालयाला सांगितले की तिचे स्त्रीधन तिला परत मिळावे आणि दोघांच्या संयुक्त मालमत्तांच्या विक्रीवर बंदी घालण्यात यावी.

एएनआय या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, पत्नीने यो यो हनी सिंग अर्थात ह्रदेश सिंह याच्याविरुद्ध घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तिस हजारी न्यायालयाच्या मुख्य महानगर दंडाधिकारी तानिया सिंग यांच्यासमोर मंगळवारी हा गुन्हा दाखल करण्यात आला. यासोबतच शालिनी तलवारच्या बाजूने एक अंतरिम आदेशही पारित करण्यात आला आहे, ज्यामध्ये हनी सिंगला दोघांच्या संयुक्त मालमत्तेपासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (हेही वाचा: Raj Kundra Pornography Case: अभिनेत्री Gehana Vasisth ला Mumbai Sessions Court कडून Interim Relief नाहीच; 6 ऑगस्टला पुढील सुनावणी)

दरम्यान, 2014 मध्ये हनी सिंगने पहिल्यांदा एका रिअॅलिटी शोमध्ये आपल्या पत्नीची लोकांशी ओळख करून दिली. बॉलीवूडच्या मेगा प्रोजेक्ट्सचा भाग बनण्यापूर्वी हनी सिंगने लग्न केले होते हे जाणून अनेकांना आश्चर्य वाटले होते. 'कॉकटेल' चित्रपटातील 'इंग्लिश बीट' या गाण्यानंतरच यो यो हनी सिंग खूप लोकप्रिय झाला.