'The Kerala Story' Controversy: 'द केरळ स्टोरी चित्रपटाच्या निर्मात्याला जाहीर फाशी द्या'- NCP MLA Jitendra Awhad
याच्या ट्रेलरनंतर, केरळमधील 32,000 महिला बेपत्ता झाल्या आणि नंतर ISIS या दहशतवादी गटात सामील झाल्याबाबत वाद निर्माण झाला. विरोधाचा सामना केल्यानंतर निर्मात्यांनी हा आकडा बदलला.
गेल्या काही दिवसांपासून 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या चित्रपटाबाबत देशभरात वाद सुरु आहे. या वादात आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी मोठे विधान केले आहे. केरळला बदनाम करण्यासाठी हा चित्रपट बनवण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. या चित्रपटाच्या निर्मात्याला फाशी द्यावी असेहि आव्हाड म्हणाले आहेत. दुसरीकडे, 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट भाजपशासित राज्यांमध्ये करमुक्त केला जात आहे. मात्र पश्चिम बंगालमध्ये सीएम ममता बॅनर्जी यांनी 'द केरळ स्टोरी'वर बंदी घालण्याच्या सूचना दिल्या आहेत.
'द केरळ स्टोरी' रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. याच्या ट्रेलरनंतर, केरळमधील 32,000 महिला बेपत्ता झाल्या आणि नंतर ISIS या दहशतवादी गटात सामील झाल्याबाबत वाद निर्माण झाला. विरोधाचा सामना केल्यानंतर निर्मात्यांनी हा आकडा बदलला. यावर प्रतिक्रिया देताना राजकारणी जितेंद्र आव्हाड म्हणाले की, 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट वस्तुस्थितीवर आधारित नाही आणि त्याचे प्रदर्शन थांबवले पाहिजे. (हेही वाचा: The Kerala Story: द केरळा स्टोरी चित्रपटाच्या क्रू मेंबरला धमकी, मुंबई पोलिसांनी दिली सुरक्षा)
आपल्या ट्वीटमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणतात, 'केरळच्या नावाने प्रदर्शित झालेला चित्रपट हा खोटारडेपणाच्या परमोच्च स्थानावर आहे. सत्य परिस्थिती केरळची वेगळीच आहे. परदेशातून भारतात येणारा जो पैसा आहे त्याच्यातील 36 टक्के पैसा हा केरळचे नागरिक पाठवतात. मागच्या वर्षी त्यांनी 2.36 लाख कोटी रुपये पाठवले. केरळचा साक्षरतेचा दर 96 टक्के आहे. जो भारताचा 76 टक्के आहे. केरळमध्ये दारिद्र्य रेषेखाली राहणारी लोक ही 0.76 टक्के आहेत. देशामध्ये ती 22 टक्के आहे. बालमृत्यूचे प्रमाण केरळमध्ये 6 टक्के आहे. आसाममध्ये 42 टक्के आहे आणि उत्तरप्रदेश मध्ये 46 टक्के आहे. केरळचे दरडोई उत्पन्न हे भारताच्या 7 टक्के अधिक आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘या चित्रपटामध्ये जी 32 हजार महिलांची कथा सांगितली गेली, त्याबद्दल स्वतः चित्रपटाचा प्रोड्यूसर म्हणतो की ही कथा फक्त 3 महिलांची आहे. चित्रपट चालवा यासाठी 32 हजार महिला सांगितल्या होत्या. म्हणजे एकंदरीत काय तर आपल्या महिला भगिनींची बदनामी करायची. आपल्या महिला भगिनी मूर्ख आहेत त्यांना काही समजतच नाही त्या वाटेल तश्या वागतात असे प्रदर्शित करायचं आणि शेवटी पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिला ह्या गौण आहेत असं चित्र उभं करायचं. हेच केरळ वर आधारीत चित्रपटाच खरं सत्य आहे. असत्याच्या आधारावर हिंसा, द्वेष निर्माण करायचा आणि त्याच माध्यमातून पुढे निवडणूका जिंकायच्या हे गणित लावूनच असे चित्रपट काढले जातात.'