Takht: करण जोहरचा महत्त्वाकांक्षी-मल्टीस्टारर चित्रपट 'तख्त'वर लागली रोख? रणवीर सिंह, आलिया भट्ट, करीना कपूर खान, अनिल कपूर साकारणार होते भूमिका

करण जोहरने ऑगस्ट 2019 मध्ये 'तख्त' चित्रपटाची घोषणा केली होती. यामध्ये रणवीर सिंह, आलिया भट्ट, करीना कपूर खान, अनिल कपूर, जान्हवी कपूर, विक्की कौशल, भूमी पेडणेकर अशा कलाकारांची वर्णी लागल्याच्या बातम्याही आल्या होत्या

Takht poster, Karan Johar (Photo credit: Instagram/Twitter)

गेल्या काही महिन्यांपासून करण जोहरचा (Karan Johar) महत्त्वाकांक्षी, मल्टीस्टारर चित्रपट 'तख्त' (Takht) चर्चेत आहे. करण जोहरने ऑगस्ट 2019 मध्ये 'तख्त' चित्रपटाची घोषणा केली होती. यामध्ये रणवीर सिंह, आलिया भट्ट, करीना कपूर खान, अनिल कपूर, जान्हवी कपूर, विक्की कौशल, भूमी पेडणेकर अशा कलाकारांची वर्णी लागल्याच्या बातम्याही आल्या होत्या. करण स्वत: हा चित्रपट दिग्दर्शित करणार होता. या चित्रपटासाठी गेले अनेक वर्षे काम सुरु होते व त्याची तयारीही जोरदार सुरु होती. पण कोरोना विषाणूमुळे सर्वच गोष्टी बदलल्या. आता या चित्रपटाविषयी एक नवीन अपडेट समोर आले आहे. आता माहिती मिळत आहे की, करणने हा आपला मेगा प्रोजेक्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी कोरोनामुळे हा प्रकल्प रखडला होता पण आता तो कायमचा बंद झाल्याच्या बातम्या येत आहेत. हा एक पीरियड ड्रामा होता, ज्यासाठी सेट्स आणि कपड्यांवर बराच पैसा खर्च होणार होता. या चित्रपटात असे अनेक प्रसिद्ध कलाकार होते ज्यांचे शुल्क खूप जास्त आहे. करणच्या या चित्रपटाचे अंदाजित बजेट सुमारे 300 कोटी रुपये होते. मात्र आज कोरोनामुळे चित्रपटाच्या व्यवसायावर ज्या प्रकारे परिणाम झाला आहे, ते पाहता असा महागडा चित्रपट बनविणे धोकादायक ठरू शकते.

‘तख्त’ हा चित्रपट मुघल इतिहासावर आधारित आहे. याक्षणी देशातील वातावरण पाहता मुघल इतिहासावर चित्रपट बनवणे हा चुकीचा निर्णय होऊ शकेल. सध्या ऐतिहासिक चित्रपटांना बराच प्रतिकार होत असून, त्यामुळे चित्रपट प्रदर्शित करणे कठीण झाले आहे.

असे म्हटले जात आहे की कोणताही स्टुडिओ या चित्रपटासोबत जुडण्यास तयार नव्हता. करणचे काही स्टुडिओशी बोलणे झाले पण पुढे काही घडले नाही. करणचे बॅनर धर्मा प्रॉडक्शनबरोबर फॉक्स स्टार स्टुडिओची भागीदारी होती, पण तोही या चित्रपटासाठी तयार नव्हता. (हेही वाचा: Sidharth Shukla ने Shehnaaz Gill सोबत केलं लग्न? सिंदूर आणि मंगळसूत्रासह अभिनेत्रीचा फोटो होतोय व्हायरल)

अशा प्रकारे धार्मिक, राजकीय किंवा सामाजिक वाद उद्भवू नये म्हणून करण जोहरने या प्रकल्पातून स्वत: ला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तो आता ‘तख्त’ या चित्रपटाच्या मुख्य जोडीसह आणखी एक चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहे.