Sushant Singh Rajput Case: रिया आणि शोविक चक्रवर्ती यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी; निकालाकडे सर्वांचे लक्ष

या तपासादरम्यान सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि शोविक चक्रवर्ती सध्या NCB च्या कोठडीत आहेत.

रिया चक्रवर्ती (Photo Credits: Instagram)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यू प्रकरणी ड्रग्सच्या अनुषंगाने तपास होत सुरु आहे. या तपासादरम्यान सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि शोविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) सध्या NCB च्या कोठडीत आहेत.  रिया आणि शोविक यांनी बॉम्बे हायकोर्टात (Bombay High Court) जामीन अर्ज दाखल केला आहे. यावर आज सुनावणी होणर आहे. दरम्यान, रिया चक्रवर्ती हिला NCB कडून 8 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

काल मुंबईच्या विशेष न्यायालयात झालेल्या सुनावणीत त्यांच्या न्यायलयीन कोठडीत 6 ऑक्टोबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे. रिया-शोविकच्या अटकेनंतर त्यांचे वकील सतीन मानेशिंदे यांनी बॉम्बे हायकोर्टात जामीन अर्ज दाखल केला. त्यावर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे रिया, शोविकला जामीन मिळणार की त्यांची अटक कायम राहणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिया आणि शोविक चक्रवर्ती यांच्यावर ड्रग्स खरेदी करण्याच्या आरोप आहे. याची कबुली खुद्द रिया चक्रवर्ती हिने NCB तपासादरम्यान दिली होती. या प्रकरणात आतापर्यंत 18 लोकांना अटक करण्यात आली आहे.

तसंच तिने तपासादरम्यान ड्रग्स कनेक्शनची संबंधित बॉलिवूडमधील कलाकारांची नावेही जाहीर केली. ड्र्गस कार्टेलमध्ये दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत, नम्रता शिरोडकर या बॉलिवूड अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. (सुशांत च्या मृत्यूप्रकरणाला ड्रग्जचे वळण लागल्यानंतर आता सारा अली खान, श्रद्धा कपूर यांना NCB कडून चौकशीसाठी समन्स धाडण्यात येणार)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत 14 जून रोजी मुंबईतील वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी मृत अवस्थेत आढळला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करत होते. मात्र सुशांतच्या वडीलांनी पटना पोलिस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई पोलिस विरुद्ध बिहार पोलिस हा वाद सुरु झाला. दरम्यान, सीबीआय चौकशीची मागणी जोर धरु लागली. सीबीआयकडे तपास सोपवण्यात आल्यानंतर ड्रग्सचा संबंध उघडकीस आला. त्यानंतर NCB कडून चौकशी सुरु झाली आणि त्यात ड्रग्स कार्टेलशी संबंध असलेल्या सुशांतच्या नजीकच्या लोकांना अटक करण्यात आली.