श्रीदेवी यांचा मृत्यू अपघाती नाही, त्यांचा खून करण्यात आला: पोलीस महासंचालकांचा दावा, बोनी कपूर यांनी दिली 'ही' प्रतिक्रिया
Sridevi and Boney Kapoor (Photo Credits: Facebook/ Sridevi)

24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबई येथील हॉटेल मध्ये श्रीदेवी (Sridevi) यांचा मृत्य झाला होता. ही घटना त्यांच्या प्रत्येक चाह्त्यासाठी धक्कादायक ठरली होती. ज्यावेळी त्यांचा मृत्य झाला तेव्हा श्रीदेवी दारू प्यायल्या होत्या, त्यानंतर त्यांचा अपघाती मृत्यू झाला असे समोर आले होते. मात्र आता या घटनेला वेगळे वळण लागले आहे. अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू हा अपघाती नसून तो एक खून होता, असा खळबळजनक दावा एका आयपीएस अधिकाऱ्याने केला आहे. न्यूज 18 ने याबाबत वृत्त दिले आहे.

ऋषिराज सिंह (Rishiraj Singh) असे या आयपीएस अधिकाऱ्याचे नाव असून, यासाठी त्यांनी त्यांचे दिवंगत डॉक्टर मित्र डॉ. उमादथन भारत यांच्या स्टेटमेंटचा हवाला दिला आहे. डॉ. उमादथन भारत हे प्रसिद्ध फॉरेंसिक सर्जन होते, त्यांनी श्रीदेवी यांच्या केसचा जवळून अभ्यास केला होता. त्यांनीच श्रीदेवी यांचा मृत्यू अपघाती नसून त्यांची हत्या झाली असल्याची माहिती सिंह यांना दिली होती. ऋषिराज सिंह यांनी उमादथन यांच्या निधनानंतर त्यांच्या आयुष्यावर एक लेख लिहिला होता. त्या लेखात त्यांनी श्रीदेवींच्या हत्येचा खळबळजनक खुलासा केला आहे.

याबाबत बोलताना बोनी कपूर म्हणाले, 'मी अशा मूर्ख गोष्टींवर प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. प्रतिक्रिया देण्याची गरजच नाही, कारण अशा उडवाउडविच्या गोष्टी येत राहातात. मुळात अशा गोष्टी कोणाच्यातरी कल्पनाशक्तीचे भाग आहे. त्यामुळे त्याच्यावर काय प्रतिक्रिया देणार?' (हेही वाचा: श्रीदेवी यांच्या पहिल्या स्मृतीदिना निमित्त 'जान्हवी कपूर'ची भावनिक पोस्ट!)

सिंह हे केरळ येथे पोलीस महासंचालक (कारागृह) म्हणून कार्यरत आहेत.  उमादथन भारत यांचे बुधवारी निधन झाले, त्यांना समर्पित लेखात या माहितीचा उल्लेख करण्यात आला आहे. उमादथन यांच्यामते कोणतीही व्यक्ती दारू पिऊन 1 फुट बाथ टबमध्ये बुडून मरू शकत नाही, याचाच अर्थ श्रीदेवी यांचा खून करण्यात आला आहे. श्रीदेवी यांचे निधन झाले त्यावेळी त्यांच्या खोलीत कुणीतरी अन्य व्यक्तिही होती. त्या व्यक्तीने श्रीदेवी यांचे पाय धरून ठेवले आणि मग त्यांचे डोके पाण्यात बुडवण्यात आले, अशी माहिती या लेखात दिली आहे.