Sridevi Kapoor Chowk: लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील जंक्शनला दिले 'श्रीदेवी कपूर चौक' नाव; महान दिवंगत अभिनेत्रीला BMC ची खास आदरांजली

आता बीएमसीनेही दिवंगत अभिनेत्रीचे स्मरण करून त्यांना मोठी श्रद्धांजली वाहिली आहे.

श्रीदेवी | संग्रहित संपादित प्रतिमा)

Sridevi Kapoor Chowk: भारतीय चित्रपटसृष्टीतील महान अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांचे 24 फेब्रुवारी 2018 रोजी निधन झाले. श्रीदेवीच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला होता. आज श्रीदेवी यांच्या मृत्यूला बरीच वर्षे उलटून गेली आहेत, परंतु अजूनही लोकांच्या हृदयात त्या जिवंत आहेत आणि कायम राहतील. आजही लोक त्यांच्या भूमिकांवर प्रेम करतात, एक व्यक्ती म्हणून त्यांचा आदर करतात. आता सुपरस्टार श्रीदेवी यांना बीएमसीने (BMC) खास श्रद्धांजली वाहिली आहे. बीएमसीने लोखंडवाला येथील एका जंक्शनला श्रीदेवीचे नाव दिले आहे. आता हे जंक्शन ‘श्रीदेवी कपूर चौक’ (Sridevi Kapoor Chowk) या नावाने ओळखले जाईल.

श्रीदेवी यांचे निधन होऊन 6 वर्षे झाली आहेत आणि चाहते आजही त्यांची आठवण काढतात. आता बीएमसीनेही दिवंगत अभिनेत्रीचे स्मरण करून त्यांना मोठी श्रद्धांजली वाहिली आहे.

लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील एक जंक्शन आता श्रीदेवी कपूर चौक म्हणून ओळखला जाईल. हा तोच परिसर आहे जिथे श्रीदेवी ग्रीन एकर्स टॉवरमध्ये राहत होत्या. त्यांच्या निधनानंतर याच परिसरातील रस्त्यावरून त्यांची अंत्ययात्रा निघाली होती. या जंक्शनला श्रीदेवीचे नाव देण्याची विनंती स्थानिक लोक आणि महापालिकेने केली होती. श्रीदेवी यांच्या आधी अमिताभ बच्चन, राज कपूर यांच्यासह अनेक स्टार्सची नाते जागा, ठिकाणे, रस्ते, चौक यांना देण्यात आली आहेत. उत्तर सिक्कीममध्ये 'बिग बी' नावाचा धबधबा आहे. तसेच सिंगापूरमधील एका ऑर्किडचे नाव 'डेंड्रोबियम अमिताभ बच्चन' असे आहे. कॅनडातील एका रस्त्याचे नाव 'राज कपूर क्रिसेंट' आहे. (हेही वाचा: Padma Vibhushan: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोनिडेला चिरंजीवी यांना पद्मविभूषण पुरस्कार केला प्रदान)

दरम्यान, 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईतील एका हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडून श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता. मात्र, अभिनेत्रीच्या मृत्यूवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. मोहित मारवाहच्या लग्नात सहभागी होण्यासाठी श्रीदेवी दुबईला गेल्या होत्या. श्रीदेवीचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाला नसून ती हत्या असल्याचे अनेकांनी सांगितले. मात्र, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण बाथटबमध्ये बुडल्याने श्वास गुदमरल्याचे नमूद करण्यात आले आहे.