Salman Khan चे चाहत्यांना लस घेण्याचे आवाहन; म्हणाला- 'लस घेऊन समाजाच्या सुरक्षेत योगदान द्या' (Watch Video)
यातच बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याने 'कोरोनाचे नियमांचे पालन करा आणि लस घ्या', असे आवाहन आपल्या चाहत्यांना केले आहे.
Salman Khan appeals fans to get Vaccinated: देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना डेल्टा प्लस या नव्या स्ट्रेनने डोके वर काढले आहे. दरम्यान, लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून आता 18 वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण खुले झाले आहे. तसंच देशातील अनेक नागरिकांनी लसींचे दोन्ही डोस घेतले आहेत. परंतु, कोरोनाचा धोका टाळण्यासाठी सर्वांनी लस घेणे अत्यंत गरजेचे आहे. यातच बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याने 'कोरोनाचे नियमांचे पालन करा आणि लस घ्या,' असे आवाहन आपल्या चाहत्यांना केले आहे.
शिवसेना नेते राहुल कनल (Rahul Kanal) यांनी सलमान खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओ पोस्टमध्ये राहुल यांनी लिहिले की, "जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि लस घेण्याचे सर्वांना आवाहन केल्याबद्दल सलमान खान भाई तुमचे आभार. पुढे त्यांनी लिहिले की, "अफवांवर लक्ष देऊ नका. तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी कोविड लस जरुर घ्या." (अभिनेता सलमान खान याचा COVID19 मध्ये पुन्हा एकदा मदतीचा हात, इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या मजूरांच्या खात्यात थेट ट्रान्सफर करणार रक्कम)
पहा व्हिडिओ:
या व्हिडिओत सलमान खान म्हणतो की, "मागील दीड वर्षापासून संपूर्ण जगभरात कोरोनाने हाहा:कार माजवला आहे. एका पाठोपाठ एक कोरोनाची लाट येत आहे. पण कोरोनाला रोखण्यासाठी लस हे एकमेव हत्यार आहे, हे आता सिद्ध झाले आहे. एकीकडे सर्वांना लस मिळण्यासाठी सरकार प्रयत्नशील असताना दुसरीकडे त्याबद्दल अनेक अफवा, चुकीची माहिती पसरवली जात आहे. त्यामुळे लोकांच्या मनात शंका उत्पन्न होते. त्यामुळे सर्वप्रथम मी आवाहन करतो की, कोरोना लसीबद्दल अफवा पसरवू नका."
पुढे सलमान म्हणतो की, "लस घेतल्याने केवळ तुम्हाला नाही तर तुमचे कुटुंब, समाज आणि संपूर्ण देश सुरक्षित करण्यात तुम्ही योगदान देत आहात. त्यामुळे तुम्हाला हात जोडून विनंती करतो की, कोरोनाची लस लवकरात लवकर घ्या. मास्क घाला. नियमित हात धुवा आणि सोशल डिस्टसिंगचे पालन करा."
दरम्यान, सलमान लवकरच 'टायगर 3' मधून कतरिना कैफ सोबत प्रेक्षकांच्या भेटीला येईल. याशिवाय 'कभी ईद कभी दिवाली' आणि 'अंतिम' या सिनेमातूनही तो झळकणार आहे.