Coronavirus मुळे 'सूर्यवंशी' चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर, दिग्दर्शक रोहित शेट्टी ने ट्विटच्या माध्यमातून दिली माहिती
मात्र आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबत कुठलीही माहिती रोहितने दिलेली नाही.
सध्या जगभरात घोंगावत असलेले कोरोना व्हायरस चे सावट पाहता सर्वच स्तरातील लोक खबरदारी बाळगत आहे. गर्दीच्या ठिकाणी न जाणे, तोंडाला मास्क लावणे यांसारख्या अनेक गोष्टी लोक करताना दिसत आहे. तसेच गर्दी होतील असे कार्यक्रम, क्रिकेट सामने देखील रद्द करण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) ने आपला आगामी चित्रपट 'सूर्यवंशी' (Sooryavanshi) प्रदर्शन पुढे ढकलले आहे. ट्विटद्वारे त्याने याबाबत माहिती दिली आहे. खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांची प्रमुख भूमिका असलेली सूर्यवंशी हा चित्रपट येत्या 24 मार्चला प्रदर्शित होणार होता. मात्र आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबत कुठलीही माहिती रोहितने दिलेली नाही.
सूर्यवंशी चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टी याने आपल्या सोशल अकाउंटवरुन याबाबत सविस्तर माहित देत “आम्ही या चित्रपटावर प्रचंड मेहनत घेतली आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच प्रेक्षकांनीही आमच्या या मेहनतीला भरभरुन दाद दिली. मात्र सध्या देशभरात करोना व्हायरसचं सावट आहे. त्यामुळे आम्ही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे.” अशा आशयाची पोस्ट लिहिली आहे.
या चित्रपटाचा दमदार ट्रेलर पाहून यात प्रेक्षकांना जबरदस्त अॅक्शनसीन्स, अक्कीचे खतरनाक स्ट्ंस पाहायला मिळणार हे काही वेगळं सांगायची गरज नाही. या चित्रपटात अक्षय कुमार शिवाय गुलशन ग्रोवर, अभिमन्यु दासानी, जॅकी श्रॉफ आणि सिकंदर खेर सुद्धा दिसतील. चित्रपटाचे कथानक मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांवर आधारित आहे. ट्रेलरमध्ये अक्षय कुमार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे.
तसेच या चित्रपटात रोहित शेट्टी याच्या 'सिंघम' चित्रपटाचा नायक अजय देवगण आणि 'सिम्बा' चा नायक रणवीर सिंह देखील विशेष भूमिकेत दिसणार आहेत.