Ranveer Singh Nude Photoshoot: अभिनेता रणवीर सिंगच्या घरी पोहोचले पोलीस; न्यूड फोटोशूट प्रकरणी अडचणी वाढल्या
रणवीर मुंबईमध्ये परतल्यावर त्याला नोटीस देण्यासाठी मुंबई पोलीस पुन्हा त्याच्या घरी जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
रणवीर सिंगने (Ranveer Singh) जेव्हापासून न्यूड फोटोशूट (Nude Photoshoot) केले आहे तेव्हापासून तो खूप चर्चेत आहे. काहींना त्याचे शूट प्रचंड आवडले तर काहींनी त्याच्यावर कडाडून टीका केली. याप्रकरणी रणवीर सिंगविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. न्यूड फोटोशूटप्रकरणी एफआयआरचा सामना करणाऱ्या बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंगच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. या तक्रारी संदर्भात शुक्रवारी मुंबई पोलीस अभिनेत्याच्या घरी पोहोचले होते. मात्र रणवीर घरी उपस्थित नसल्याने पोलिसांना माघारी फिरावे लागले.
शुक्रवारी मुंबई पोलीस अभिनेता रणवीर सिंगच्या घरी पोहोचले, जिथे तो शहरात नसल्याचे समजले. रणवीर मुंबईमध्ये परतल्यावर त्याला नोटीस देण्यासाठी मुंबई पोलीस पुन्हा त्याच्या घरी जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 22 ऑगस्टपूर्वी रणवीरला चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर व्हावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. रणवीरने गेल्या महिन्यात एका मासिकाच्या कव्हर पेजसाठी न्यूड फोटोशूट केले होते, त्यानंतर तो अचानक चर्चेत आला होता. या फोटोंमध्ये रणवीर पूर्णपणे नग्न अवस्थेमध्ये होता.
आज पोलिसांना सांगण्यात आले की तो 16 ऑगस्ट रोजी परत येईल. रणवीरच्या फोटोंच्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी 26 जुलै रोजी अभिनेत्याविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. एका एनजीओच्या अध्यक्षांनी रणवीर सिंगविरोधात ही तक्रार केली आहे. तक्रारीनुसार, अभिनेत्याने त्याचे नग्न फोटो पोस्ट करून ‘मोठी कमाई’ करण्यासाठी, ‘लहान मुलांवर आणि मोठ्या प्रमाणावर समाजावर वाईट छाप पाडली. या कृत्याने त्याने महिलांच्या प्रतिष्ठेलाही धक्का लावण्याचा प्रयत्न केला आहे. (हेही वाचा: 'कच्चा बदाम' फेम अंजली अरोडा हिला कथीत MMS लीक प्रकरणावर फुटले रडू, म्हणाली 'अब्रुशी खेळू नका')
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आम्ही या प्रकरणाच्या तपासाचा एक भाग म्हणून चेंबूर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरच्या संदर्भात त्याचे म्हणणे नोंदवू.’ रणवीरवर भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 292, 293 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.