Ranbir Kapoor आणि Alia Bhatt यांचा होत आहे साखरपुडा? रणधीर कपूर यांनी केला मोठा खुलासा 

अलीकडेच रणबीर कपूरने एका मुलाखतीत आपल्या लग्नाच्या योजनेबद्दल खुलासा केला होता. कोरोनामुळे तो यावर्षी आलियाशी लग्न करू शकला नाही असे त्याने सांगितले होते

Ranbir Kapoor and Alia Bhatt (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याची आई नीतू कपूर, गर्लफ्रेंड आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि बहीण रिद्धिमा कपूरसमवेत जयपूरच्या दौर्‍यावर आहेत. त्यासोबत रणबीर आणि आलियाचा खास मित्र अयान मुखर्जीही सध्या जयपूरमध्येच आहेत. आता याला योगायोग म्हणा किंवा ठरवलेली योजना म्हणा पण रणबीरच्या कुटूंबाशिवाय बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण पती रणवीर सिंहसोबत जयपूरला पोहोचली आहे. आता अचानक हे लोक जयपूरला पोहोचल्यानंतर चर्चेला उधाण आले आहे. ही चर्चा आहे ती रणबीर आणि आलिया यांच्या साखरपुड्याची. रनथंबोरच्या या खास ट्रीपमध्ये आलिया व रणबीर यांचा साखरपुडा होणार असल्याचे म्हटले जात होते.

आता रणबीरचे काका रणधीर कपूर (Randhir Kapoor) यांनी या चर्चेवर पडदा टाकला आहे. रणधीर कपूर यांनी 'द इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना पुष्टी केली की, आलिया आणि रणबीर सध्या साखरपुडा करणार नाहीत. ते म्हणाले, ‘हे खरे नाही. जर रणबीर आणि आलिया साखरपुडा करणार असतील तर आमचे कुटुंबही त्यांच्याबरोबर असते. आलिया, रणबीर आणि नीतू तिथे सुट्टी साजरी करण्यासाठी आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी गेले आहेत. या दोघांच्याही साखरपुड्याची बातमी खोटी आहे.’

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाच्या आणि एंगेजमेंटच्या बातम्या बर्‍याच दिवसांपासून समोर येत आहेत. काही काळापूर्वी दोघांचे फेक लग्न कार्डही व्हायरल झाले होते. 30 डिसेंबर रोजी त्याची एंगेजमेंट होणार असल्याचीही बातमी होती, मात्र आता हा सर्व बातम्या खोट्या असल्याचे समोर आले आहे, (हेही वाचा: आलिया भट्टसोबतच्या लग्नाबाबत रणबीर कपूरचा खुलासा, '...तर यावर्षी आमचे लग्न झाले असते.')

दरम्यान, रणबीर आणि आलिया अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्रमध्ये एकत्र काम करत आहेत. अलीकडेच रणबीर कपूरने एका मुलाखतीत आपल्या लग्नाच्या योजनेबद्दल खुलासा केला होता. कोरोनामुळे तो यावर्षी आलियाशी लग्न करू शकला नाही असे त्याने सांगितले होते, नाहीतर या वर्षात दोघांचेही लग्न झाले असते.