अदनान सामी याच्या पद्मश्रीला 'मनसे'चा विरोध; पुरस्कार त्वरित रद्द करण्याची मागणी

ते मूळ भारतीय नागरिक नसल्याचा दावा करत मनसेने हा विरोध दर्शविला आहे

Raj Thackeray and Adnan Sami (Photo Credits: PTI)

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS), शनिवारी गायक-संगीतकार अदनान सामी (Adnan Sami) यांना केंद्राने, पद्मश्री देण्यासंदर्भात आक्षेप नोंदविला. ते मूळ भारतीय नागरिक नसल्याचा दावा करत मनसेने हा विरोध दर्शविला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. एकता कपूर, कंगना रनौत, अदनान सामी सोबत 118 व्यक्तींना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.

गृहराज्य मंत्रालयाच्या यादीमध्ये अदनान सामी याचे गृहराज्य महाराष्ट्र दर्शवित आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी ट्विट करुन याबाबत आपला तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे.

26 मे 2015 रोजी पाकिस्तानी पासपोर्टची मुदत संपल्यावर, सामीने त्याचे नूतनीकरण केले नाही. त्यानंतर 1 जानेवारी 2016 पासून अदनान सामीला भारतीय नागरिकत्व देण्यात आले. पाकिस्तानमधील लाहोरमध्ये जन्मलेला सामी, 13 मार्च 2001 रोजी प्रथम एक वर्षाच्या प्रवासी व्हिसावर भारतात आला होता. अमेय यांनी केलेल्या ट्विटमध्ये ते स्पष्टपणे म्हणतात, 'मूळ भारतीय नागरिक नसलेल्या अदनान सामीला भारत सरकारने कोणताही पुरस्कार देऊ नये, हे मनसेचे ठाम मत आहे'. इतकेच नाही तर हा पुरस्कात त्वरित मागे घेण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

(हेही वाचा: Padma Award 2020: अरुण जेटली, सुषमा स्वराज, जॉर्ज फर्नांडिससह 7 जणांना पद्म विभूषण पुरस्कार जाहीर; पहा संपूर्ण यादी)

योगायोगाने, 23  जानेवारी रोजी मुंबई शहरातील गोरेगाव येथे मनसेचे महाअधिवेशन पार पडले. यामध्ये राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा पुढील मार्ग आखण्यासाठी, आपण हिंदुत्वाचा आधार घेत असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आता लगेच त्यांनी अदनान सामी याच्या पद्मश्रीला विरोध दर्शविला आहे. दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 7 व्यक्तींना पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याचबरोबर 16 सेलिब्रिटींना पद्मभूषण आणि 118 व्यक्तींना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.