'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या अपयशानंतर निर्माते Vashu Bhagnani यांनी विकले आपले ऑफिस; 250 कोटी रुपयांचे होते कर्ज, 80% कर्मचाऱ्यांना काढून टाकले- Reports

या चित्रपटामुळे आपली आधीची सर्व कर्जे चुकतील अशी त्यांची अपेक्षा होती पण तसे झाले नाही. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला.

Vashu Bhagnani (Photo Credits: X)

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारची (Akshay Kumar) बॉक्स ऑफिसवर सध्या खराब स्थिती चालू आहे. गेल्या काही महिन्यांत त्याच्या एकाही चित्रपटाने अपेक्षित कामगिरी केली नाही. त्याचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरत असल्याने निर्मात्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. अक्षय कुमारच्या बॅक टू बॅक फ्लॉप चित्रपटांमुळे ज्या निर्मात्याला सर्वात जास्त त्रास सहन करावा लागला, तो म्हणजे निर्माता वाशू भगनानी (Vashu Bhagnani). वाशू भगनानीचे प्रोडक्शन हाऊस पूजा एंटरटेनमेंट तोट्यात आहे.

अक्षय कुमारचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाची निर्मितीही वाशू भगनानी यांनी केली होती. या चित्रपटामुळे आपली आधीची सर्व कर्जे चुकतील अशी त्यांची अपेक्षा होती पण तसे झाले नाही. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला. आता पूर्णपणे कर्जात बुडालेल्या वाशू भगनानी यांना त्यांचे मुंबईचे ऑफिस विकावे लागले आहे.

वाशू भगनानीच्या प्रॉडक्शन हाऊस पूजा एंटरटेनमेंटने कुली नंबर 1 आणि हिरो नंबर 1 सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मात्र कोविडनंतर त्यांना खूप तोटा सहन करावा लागला. कोविडनंतर त्यांनी 150 कोटींच्या बजेटमध्ये बेल बॉटम बनवला जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. हा चित्रपट केवळ 26.50 कोटींची कमाई करू शकला. बॉलीवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, अक्षय कुमारचा मिशन राणीगंजही फ्लॉप ठरला होता. त्याचवेळी नेटफ्लिक्सने टायगर श्रॉफच्या गणपतचे हक्क विकत घेण्यासही नकार दिला होता.

रिपोर्टनुसार, पूजा एंटरटेनमेंटवर 250 कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यामुळे त्यांना त्यांचे सात मजली कार्यालय विकावे लागले. याआधी कंपनीच्या आर्थिक स्थितीबाबत धोक्याची चिन्हे दिसत होती. त्यानंतर बडे मियाँ छोटे मियाँच्या उच्च बजेटमुळे ती आणखीच बिकट झाली. मात्र तरीही अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ अभिनीत हा चित्रपट आपली आर्थिक स्थिती सुधारेल अशी फर्मला आशा होती. मात्र हा चित्रपटही फ्लॉप ठरला. त्यानंतर मोठ्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वाशूकडे इमारत विकण्याशिवाय पर्याय नव्हता. (हेही वाचा: Munjya Box Office Collection Day 16: शर्वरी वाघ, अभय वर्मा यांचा हॉरर-कॉमेडी चित्रपट मुंज्याची 100 कोटींकडे घोडदौड; भारतात गाठला 'इतक्या' कोटींचा टप्पा)

याशिवाय, त्यांनी सुमारे 80% कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे आणि त्यांनी आपले कार्यालय जुहू येथील 2 बेडरूमच्या फ्लॅटमध्ये हलवले आहे. दुसरीकडे नुकसान होऊनही पूजा एंटरटेनमेंट आपले काम थांबवत नसल्याचे सांगितले जात आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी शाहिद कपूरच्या 'अश्वत्थामा' या चित्रपटाची घोषणा केली होती. हा चित्रपट ते बनवत आहेत.