Pathaan Makes History: शाहरुख खानच्या पठानने रचला नवा इतिहास; ठरला बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 100 कोटी पार करणारा पहिला बॉलिवूड चित्रपट
प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीमुळे पठाणच्या दुसऱ्या दिवशी कलेक्शनमध्ये आणखी मोठी उडी दिसेल असे समजले जात आहे.
‘पठान’ (Pathaan) या चित्रपटाद्वारे तब्बल 4 वर्षानंतर शाहरुख खानने (Shah Rukh Khan) मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. प्रदर्शनानंतर पठानने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करण्यास सुरुवात केली आहे. 'पठाण' देशातच नव्हे तर जगातही कमाईचे नवे विक्रम करत आहे. चित्रपटाच्या एका दिवसाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने एका दिवसात जगभरात जवळपास 100 कोटींचा आकडा पार केला आहे.
शाहरुख खानचा पठान हा चित्रपट काही काळापासून चर्चेचा विषय ठरला होता. अखेर बुधवारी, 25 जानेवारी रोजी तो चित्रपटगृहात दाखल झाला. या चित्रपटाला प्रदर्शित होण्यापूर्वी आणि नंतरही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पठानचे पहिले गाणे प्रदर्शित झाल्यानंतरच चित्रपटाबाबत बहिष्कार आणि निषेध सुरु झाला होता. मात्र आता चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. एका दिवसात जागतिक बॉक्स ऑफिसवर 100 कोटी पार करणारा पठान हा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला आहे.
बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, पठानने पहिल्या दिवशी भारतात अंदाजे 67 कोटी रुपये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी 36.7 कोटी रुपये कमावले आहेत. अशाप्रकारे चित्रपटाने पहिल्या दिवशी जगभरात सुमारे 103 कोटी रुपये कमाई केली आहे. शाहरुख खान, दीपिका पदुकोण अभिनीत पठान हा चित्रपट भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा बॉलिवूड ओपनिंग चित्रपट ठरला आहे. पठानने दुसऱ्या दिवशी रात्री 10.10 पर्यंत 31.60 कोटींची कमाई केली आहे. (हेही वाचा: अभिनेत्री Kangana Ranaut ने इमर्जन्सी चित्रपटासाठी आपली संपूर्ण मालमत्ता ठेवली गहाण, जाणून घ्या काय म्हणाली (Watch Video))
देशात पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिस यांनी पहिल्या दिवशी 27.05 कोटी रुपयांची कमाई केली आहे, जे एकूण संकलनाच्या जवळपास 50 टक्के योगदान देते. प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीमुळे पठाणच्या दुसऱ्या दिवशी कलेक्शनमध्ये आणखी मोठी उडी दिसेल असे समजले जात आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठान हा हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत रिलीज झाला आहे. या वीकेंडमध्ये हा चित्रपट जवळपास 200 कोटींची कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.