Pandit Birju Maharaj Passes Away: प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
यासोबतच त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सन्मानही मिळाला आहे. बनारस हिंदू विद्यापीठ आणि खैरागड विद्यापीठाने बिरजू महाराजांना मानद डॉक्टरेट बहाल केली आहे
प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज (Pandit Birju Maharaj) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. पद्मविभूषण पुरस्कार विजेते बिरजू महाराज यांनी वयाच्या 83 व्या वर्षी, रविवारी आणि सोमवारी मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला. त्यांचा नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली. गायिका मालिनी अवस्थी आणि गायक अदनान सामी यांनीही सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. लखनौ घराण्यातील बिरजू महाराज यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1938 रोजी लखनौ येथे झाला. त्यांचे खरे नाव पंडित बृजमोहन मिश्रा होते.
कथ्थक नर्तक असण्यासोबतच ते शास्त्रीय गायकही होते. बिरजू महाराज यांचे वडील आणि गुरु अच्छन महाराज, काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज हे देखील प्रसिद्ध कथ्थक नर्तक होते. देवदास, देढ इश्किया, उमराव जान आणि बाजीराव मस्तानी यांसारख्या चित्रपटांसाठी बिरजू महाराज यांनी नृत्यदिग्दर्शन केले. याशिवाय सत्यजित रे यांच्या 'शतरंज के खिलाडी' या चित्रपटाला त्यांनी संगीत दिले होते.
बिरजू महाराज यांना 1983 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यासोबतच त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सन्मानही मिळाला आहे. बनारस हिंदू विद्यापीठ आणि खैरागड विद्यापीठाने बिरजू महाराजांना मानद डॉक्टरेट बहाल केली आहे. 2012 मध्ये, त्यांना विश्वरूपम चित्रपटातील नृत्य नृत्यदिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2016 मध्ये, बाजीराव मस्तानीच्या ‘मोहे रंग दो लाल’साठी त्यांना नृत्यदिग्दर्शनासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. (हेही वाचा: ज्येष्ठ अभिनेते Vikram Gokhale यांचा नवा चित्रपट; स्वतः केले लेखन, संपादन, संगीत आणि दिग्दर्शन, ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीचा समावेश)
बिरजू महाराज यांनी वयाच्या 13 व्या वर्षी नवी दिल्लीतील संगीत भारती येथे नृत्य शिकवण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील भारतीय कला केंद्रातही शिक्षण देणे सुरु केले. काही काळानंतर त्यांनी कथ्थक केंद्रात (संगीत नाटक अकादमीचे एक युनिट) शिकवण्याचे काम सुरू केले. येथे ते प्राध्यापक आणि संचालकही होते. त्यानंतर 1998 मध्ये त्यांनी तेथून निवृत्ती घेतली. यानंतर दिल्लीतच कलाश्रम नावाने थिएटर स्कूल सुरू केले.