Sonali Phogat Murder Case: सोनाली फोगट खून प्रकरणात मोठा खुलासा; पीए सुधीर सांगवान ने दिली गुन्ह्याची कबुली, कट रचून केली होती हत्या
सोनाली फोगटला गुडगावहून गोव्यात आणण्याचा कट रचल्याची कबुली सुधीर सांगवानने दिल्याचा दावा गोवा पोलिस सूत्रांनी केला आहे.
Sonali Phogat Murder Case: सोनाली फोगट (Sonali Phogat) खून प्रकरणाशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. सोनाली फोगटच्या मृत्यूचा कट रचल्याची कबुली आरोपी सुधीर सांगवान (Sudhir Sangwan) याने दिली आहे. यासंदर्भात गोवा पोलिस सूत्रांनी माहिती दिली आहे. सोनाली फोगटला गुडगावहून गोव्यात आणण्याचा कट रचल्याची कबुली सुधीर सांगवानने दिल्याचा दावा गोवा पोलिस सूत्रांनी केला आहे. गोव्यात शूटिंगचा कोणताही प्लान नव्हता, गोव्यात आणण्याचा हा कट होता, असे पोलिसांनी सांगितले
गोवा पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली फोगटच्या हत्येचा कट फार पूर्वीपासून रचला गेला होता. दरम्यान, या प्रकरणी लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत. गोवा पोलिसांनी पुष्टी केली आहे की सर्व संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. सुधीर सांगवान खून प्रकरणात दोषी ठरविण्यासाठी हे पुरेसे आहेत. (हेही वाचा - Sukesh Chandrashekhar Case: सुकेश चंद्रशेखर प्रकरणात Nora Fatehi ची तब्बल 7 तास चौकशी)
गोवा पोलीस आज आरोपी सुधीर सांगवानच्या रोहतक येथील घरीही भेट देऊ शकतात. यादरम्यान सुधीर सांगवान यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली जाऊ शकते. सोनाली फोगटचे भाऊ वतन ढाका आणि रिंकू ढाका यांनी सांगितले की, त्यांचे गोवा पोलिसांशी बोलणे झाले असून त्यांनी आज रोहतक येथील सुधीर सांगवान यांच्या घरी चौकशीसाठी जाणार असल्याची माहिती दिली आहे. सुधीर सांगवान यांच्या घरी जाऊन गोवा पोलीस आज आणखी काही लोकांचे जबाब नोंदवू शकतात.
दरम्यान, 23 ऑगस्ट रोजी गोव्यात सोनाली फोगटचा रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार सोनाली फोगटच्या शरीरावर जखमेच्या खुणाही आढळून आल्या आहेत. या प्रकरणी सोनाली फोगटचा पीए सुधीर सांगवान आणि त्याचा साथीदार सुखविंदर यांना अटक करण्यात आली आहे. गोवा पोलिसांनी नंतर कुर्लीज रेस्टॉरंटचा मालक एडविन न्युन्स आणि दोन ड्रग्ज तस्करांनाही अटक केली.