Oscars 2023: काजोल, सुरियासह 5 भारतीय सेलिब्रिटी होणार ऑस्कर समितीचे सदस्य; 95 व्या अकादमी पुरस्कारांसाठी करणार मतदान
त्यामुळे यावर्षी ऑस्कर समितीसाठी आमंत्रित केलेल्या 397 नवीन सदस्यांमध्ये तिचे नाव असणे ही खचितच आनंदाची बाब आहे. तिने हे आमंत्रण स्वीकारल्यास, ती पुढील वर्षी 95 व्या अकादमी पुरस्कारांसाठी मतदान करण्यास पात्र असेल.
भारतासह जगातील अनेक देशांमध्ये दरवर्षी अकादमी पुरस्कारांची (95th Academy Awards) प्रतीक्षा असते. हा पुरस्कार चित्रपटसृष्टीमधील एक मानाचा पुरस्कार समजला जातो. अशा परिस्थितीत आता भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ‘अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ने (Academy of Motion Picture Arts and Sciences) या वर्षी सदस्य होण्यासाठी आमंत्रित केलेल्या 397 जणांमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील पाच जणांचा समावेश आहे. अभिनेत्री काजोल (Kajol), अभिनेत्री सुरिया, चित्रपट निर्माता सुष्मित घोष, रिंटू थॉमस आणि रीमा कागती यांची नावे यामध्ये समाविष्ट आहेत.
या समितीमध्ये याआधी एआर रहमान, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, विद्या बालन, आमिर खान आणि सलमान खान यांचा समावेश झाला आहे. 'द अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस'ने मंगळवारी जाहीर केलेल्या 2022 च्या गेस्ट लिस्टमध्ये बॉलिवूडमधून एकमेव कलाकार ‘काजोल’चे नामांकन करण्यात आले. ऑस्करच्या गेस्ट श्रेणीमध्ये समाविष्ट असलेल्या सदस्याला पुरस्कारासाठी मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होतो.
या यादीत असे कलाकार आणि निर्माते-दिग्दर्शकांच्या नावांचा समावेश आहे, ज्यांनी सिनेजगतात कौतुकास्पद योगदान दिले आहे. सदस्यत्वाची निवड व्यावसायिक पात्रतेवर आधारित आहे. अकादमीच्या निवेदनानुसार, ‘2022 मध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केलेल्यांपैकी 44 टक्के महिला आहेत, 37 टक्के कमी प्रतिनिधित्व केलेल्या वांशिक समुदायांशी संबंधित आहेत आणि 50 टक्के 53 देश आणि टक्के युनायटेड स्टेट्स बाहेरील प्रदेशातील आहेत.’ (हेही वाचा: पाच वर्षांनंतर भारतामध्ये परफॉर्म करणार जस्टिन बीबर; जाणून घ्या कधी आणि कुठे होणार कार्यक्रम)
काजोल पुढील महिन्यात चित्रपटसृष्टीत तीन दशके पूर्ण करणार आहे. त्यामुळे यावर्षी ऑस्कर समितीसाठी आमंत्रित केलेल्या 397 नवीन सदस्यांमध्ये तिचे नाव असणे ही खचितच आनंदाची बाब आहे. तिने हे आमंत्रण स्वीकारल्यास, ती पुढील वर्षी 95 व्या अकादमी पुरस्कारांसाठी मतदान करण्यास पात्र असेल. या बातमीवर काजोलने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.