Online Bank Fraud: ऑनलाइन फसवणुकीचा बळी पडले अभिनेते Annu Kapoor; KYC अपडेट करण्याच्या बहाण्याने लुटले लाखो रुपये

अशा प्रकारे त्यांची 4.36 लाख रुपयांची फसवणूक झाली. मात्र, बँकेने फोन करून ताबडतोब अभिनेत्याला या व्यवहारांची माहिती दिली.

Annu Kapoor (संग्रहित संपादित प्रतिमा)

भारतीय चित्रपटांमधील ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर (Actor Annu Kapoor) अनेकदा आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहतात. परंतु आता ते एका वेगळ्याच कारणामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. लोकप्रिय अभिनेते अन्नू कपूर एका मोठ्या ऑनलाइन फसवणुकीला (Online Bank Fraud) बळी पडले आहेत. अनेक माध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे. अन्नू कपूर यांची सुमारे 4 लाख 36 हजारांची फसवणुक झाली आहे.

एका आघाडीच्या खाजगी बँकेचा अधिकारी बनून केवायसी तपशील अपडेट करण्याच्या बहाण्याने अन्नू कपूर यांची फसवणूक करण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई केल्यामुळे अभिनेत्याला त्यांच्या फसवलेल्या रकमेतून 3 लाख 8 हजार रुपये परत मिळणार आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली.

ओशिवरा पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अन्नू कपूर यांना गुरुवारी बँक कर्मचारी म्हणून एका व्यक्तीचा कॉल आला होता, ज्याने सांगितले की अभिनेत्याला त्यांचा केवायसी फॉर्म अपडेट करणे आवश्यक आहे. यानंतर अन्नु कपूर यांनी त्यांचे बँक तपशील आणि वन टाईम पासवर्ड म्हणजेच ओटीपी त्या व्यक्तीसोबत शेअर केला.

काही वेळानंतर कॉलरने अन्नू कपूरच्या खात्यातून दोनदा इतर दोन खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले. अशा प्रकारे त्यांची 4.36 लाख रुपयांची फसवणूक झाली. मात्र, बँकेने फोन करून ताबडतोब अभिनेत्याला या व्यवहारांची माहिती दिली आणि त्यांच्या खात्यात छेडछाड झाल्याचेही कळवले. बँकेतून फोन आल्यानंतर अन्नू कपूर यांनी क्षणाचाही विलंब न लावता पोलिसांशी आणि ज्या बँकांमध्ये पैसे ट्रान्सफर केले होते त्यांच्याशीही संपर्क साधला. (हेही वाचा: निर्माती एकता कपूरच्या अडचणीमध्ये वाढ; न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी, जाणून घ्या कारण)

ही दोन्ही खाती बँकांनी गोठवली आहेत आणि अभिनेत्याला 3.08 लाख रुपये परत मिळतील, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. याबाबत भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑनलाइन फसवणूक करणाऱ्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.