Nawazuddin Siddiqui Rape Case: अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीविरुद्ध पत्नी Aaliya Siddiqui ने दाखल केला बलात्काराचा गुन्हा; समोर आला धक्कादायक व्हिडीओ (Watch)
आलियाने नवाजुद्दीन आणि त्याच्या आईवर अत्याचार केल्याचा आरोपही केला आहे. दुसरीकडे, नवाजुद्दीनच्या आईनेही आलियावर गुन्हा दाखल केला आहे.
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी (Aaliya Siddiqui) उर्फ अंजना किशोर पांडे यांच्यातील वाद संपण्याचे नाव घेत नाहीत. आता आलिया सिद्दीकीने अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप केला असून, त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्याच्या पत्नीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करून याची माहिती दिली.
तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘एक महान अभिनेता जो अनेकदा महान माणूस बनण्याचा प्रयत्न करतो. त्याची आई माझ्या निष्पाप मुलांना ‘नाजायज़’ म्हणते आणि हा बिचारा गप्प बसतो. काल (23 फेब्रुवारी 2023) मुंबईतील वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार (पुराव्यासह) दाखल केली. काहीही झाले तरी मी माझ्या निष्पाप मुलांना या निर्दयी हातात पडू देणार नाही.’
गेले अनेक दिवस नवाजुद्दीन आणि आलियामध्ये मुलांच्या कस्टडीबाबत वाद सुरु आहे. आज एक व्हिडिओमध्ये आलिया रडत रडत तिची अवस्था सांगत आहे. तिने नवाजुद्दीन सिद्दीकीवर आरोप केला आहे की, त्याला आपल्याकडून मुले हिसकावून घ्यायची आहेत. ती म्हणते, 'नवाजने काल कोर्टात केस दाखल केली आहे, ज्यामध्ये त्याला मुलांचा ताबा हवा आहे. पैशाने तुम्ही सर्व काही विकत घेऊ शकता, पण माझ्या मुलांना माझ्यापासून हिरावून घेता येणार नाही. नवाजला आजपर्यंत मुलांबद्दल काहीही माहिती नव्हती. मुले कशी मोठी झाली हे देखील त्याला माहित नव्हते. अशावेळी तो त्यांची काळजी कशी घेणार हेच कळत नाही.’
ती पुढे म्हणते. ‘माझ्याकडून मूल हिसकावून त्याला आपल्या शक्तीने दाखवायचे आहे की तो खूप चांगला बाप आहे. परंतु तो चांगला बाप नाही, तो एक भित्रा बाप आहे, जो आईपासून आपले मूल हिसकावत आहे. तो त्याच्या सत्तेचा गैरवापर करत आहे.’ नवाजची पत्नी पुढे म्हणते. ‘त्याने मला कधीही आपली पत्नी मानले नाही, परंतु मी त्याला नेहमीच माझा पती मानत आले आहे. माझ्या तारुण्याच्या दिवसापासून आजपर्यंतची अनेक महत्त्वाची वर्षे मी त्याला दिली आहेत. मी आता 40 वर्षांची आहे. माझे आधीच आर्थिक नुकसान होत आहे. त्याने मला सर्व बाजूंनी कमजोर केले आहेस. परंतु माझा कायदा आणि न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे की निकाल माझ्या बाजूने येईल.’
(हेही वाचा: मुंबई पोलिसांनी आलिया भट्टला तक्रार दाखल करण्यास सांगितले)
दरम्यान, नवाजुद्दीन आणि त्याची पत्नी आलिया यांच्यात अनेक दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू आहेत. आलियाने नवाजुद्दीन आणि त्याच्या आईवर अत्याचार केल्याचा आरोपही केला आहे. दुसरीकडे, नवाजुद्दीनच्या आईनेही आलियावर गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे आज मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता आणि त्याची पत्नी आलिया यांना मुलांच्या हितासाठी त्यांच्यातील मतभेद सौहार्दपूर्णपणे मिटवण्याचा प्रयत्न करावा, असे सुचवले आहे.