IPL Auction 2025 Live

Mahesh Bhatt on Luviena Lodh's Allegations: सुनेने केलेल्या गंभीर आरोपांवर महेश भट्ट यांची प्रतिक्रिया; दिला कायदेशीर कारवाईचा इशारा (Watch Video)

याआधी सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातही त्यांचे नाव समोर आले होते. आता खुद्द त्यांच्या सुनेने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Mahesh Bhatt, Luviena Lodh (Photo Credits: PTI, Instagram)

विवाद आणि महेश भट्ट  (Mahesh Bhatt) यांचे फार पूर्वीपासूनचे नाते आहे. याआधी सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातही त्यांचे नाव समोर आले होते. आता खुद्द त्यांच्या सुनेने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महेश भट्ट हे चित्रपट इंडस्ट्रीमधील डॉन असून त्यांनी अनेकांचे जीवन उध्वस्त केले आहे, असा आरोप महेश भट्ट यांचा भाचा सुमित सभरवाल याची पत्नी लवीना लोधने (Luviena Lodh) केला आहे. आता त्यावर महेश भट्ट यांच्याकडून प्रत्युत्तर आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, महेश भट्ट यांच्या वकिलांनी निवेदन जारी करून सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

ते म्हणाले, ‘आमचे क्लायंट महेश भट्ट यांच्यावर लवीना लोधा यांनी एका व्हिडिओच्या मार्फत जे आरोप केले आहेत, ते आम्ही फेटाळून लावतो. असे आरोप केवळ खोटे आणि अपमानजनकच नाहीत तर ते गंभीर असून तो कायदेशीर गुन्हा आहे. या प्रकरणात महेश भट्ट हे कायदेशीर कारवाई करतील.’

अभिनेत्री लवीना लोधाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये महेश भट्ट यांना बॉलिवूडचा डॉन असल्याचे म्हटले आहे. व्हिडिओमध्ये लवीनाने महेश भट्टचा भाचा आणि विशेष फिल्स्मचे प्रमुख सुमित सभरवाल यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. या व्हिडिओमध्ये लवीना म्हणते, ‘माझे लग्न महेश भट्ट यांचा भाचा सुमित सभरवालशी झाले होते. सुमित ड्रग्ज आणि मुलींचा पुरवठा करत आहे, ही गोष्ट मला समजली व आता मला घटस्फोट हवा आहे. महेश भट्ट यांना या सर्व गोष्टी माहित आहेत. ही संपूर्ण सिस्टीम तेच चालवतात. तुम्ही जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागला नाहीत तर ते तुमचे जीवन मुश्कील करतात. महेश भट्ट यांनी अनेक कलाकारांचे आयुष्य बरबाद केले आहे. त्यांच्या एका फोन कॉलमुळे अनेकांची कामे गेली आहेत.’

लवीना पुढे म्हणते, ‘जेव्हापासून मी त्यांच्या विरोधात केस फाईल केली आहे तेव्हापासून त्यांनी मलाही अनेक प्रकारे त्रास द्यायचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनीही माझी तक्रार लिहून घेतली नाही. त्यामुळे उद्या जर का मी व माझ्या कुटुंबाला काही झाले तर त्यासाठी महेश भट्ट, मुकेश भट्ट, सुमित सभरवाल, साहिल सहगल आणि कुमकुम सहगल जबाबदार असतील.’

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर तो सोशल मिडियावर बराच व्हायरल झाला आहे. लोक महेश भट्ट यांच्याबाबत नकारात्मक कमेंट्स करताना दिसत आहेत. मात्र आता महेश भट्ट यांनी हे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगून याबाबत कायदेशीर कारवाईची इशारा दिला आहे.



संबंधित बातम्या