अनुराधा पौडवालच आपली आई असल्याचा केरळच्या महिलेचा दावा; 50 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी

45 वर्षांच्या करमाला मॉडेक्सने (Karmala Modex) 67 वर्षांच्या अनुराधा पौडवालविरूद्ध तिरुअनंतपुरम येथील कौटुंबिक न्यायालयात खटला दाखल केला आहे.

अनुराधा पौडवाल (संग्रहित संपादित प्रतिमा)

ऐश्वर्या रायच आपली आई असल्याचा दावा आंध्र प्रदेश मधील एका 29 वर्षीय युवकाने केला होता. आता केरळमधील (Kerala) एका महिलेने बॉलिवूड गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) आपली बायोलॉजिकल आई असल्याचा दावा केला आहे. 45 वर्षांच्या करमाला मॉडेक्सने (Karmala Modex) 67 वर्षांच्या अनुराधा पौडवालविरूद्ध तिरुअनंतपुरम येथील कौटुंबिक न्यायालयात खटला दाखल केला आहे. याबाबत तिने 50 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. करमाच्या मते, तिचा जन्म 1974 साली झाला होता. ती अवघी चार दिवसांची असताना, अनुराधाने तिला पोन्नाचन आणि अ‍ॅग्नेस या दांपत्याला दिले होते.

करमाला पुढे म्हणते, त्यावेळी अनुराधा पार्श्वगायिका म्हणून आपले करिअर सुरु करत होती. चालू असलेली धावपळ, व्यस्त रेकॉर्डिंगमध्ये ती मुलीची जबाबदारी स्वीकारायला तयार नव्हती. सुमारे पाच वर्षांपूर्वी, वडील पोन्नाचन यांनी मृत्यूशय्येवर असताना अनुराधा पौडवाल आपली आई असल्याचे सत्य सांगितले. ते अनुराधाचा जवळचा मित्र होते असेही त्यांनी सांगितले. वडिलांच्या तोंडून सत्य ऐकल्यानंतर करमालाने अनुराधाशी फोनवरुन बर्‍याच वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, समोरून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर करमालाचा नंबर ब्लॉक करण्यात आला.

करमाला हिचे वकील अनिल प्रसाद म्हणाले की, ‘करमालाचा ज्या जीवनावर आणि बालपणावर हक्क होता, त्यापासून तिला वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे आता जर अनुराधाने आमचा दावा फेटाळला तर आम्ही कोर्टाकडून डीएनए चाचणीची मागणी करू. 50 कोटींच्या नुकसान भरपाईव्यतिरिक्त अनुराधा पौडवाल यांचे पती अरुण पौडवाल यांच्या मालमत्तेतही करमालाने काही टक्के हक्क सांगितला आहे. आता हा प्रकरणावर अनुराधा पिद्वाल काय प्रतिक्रिया देतील ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.