'कंगना रनौत अंमली पदार्थाचा ओव्हरडोज करून अशी वक्तव्ये देत आहे, तिचा पद्मश्री परत घ्या व तिच्यावर गुन्हा दाखल करावा- Minister Nawab Malik
दिल्लीतील सत्ताधारी पक्षाने रणौतच्या वक्तव्याचा निषेध केला असून कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे
बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) देशाच्या स्वातंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद वाढत चालला आहे. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी त्यांच्या दैनंदिन पत्रकार परिषदेत कंगनावर निशाणा साधला. मलिक यांनी अभिनेत्रीचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्याची आणि तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कंगनाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केल्याचे मलिक म्हणाले. मलिक म्हणाले की, कंगना मलाना क्रीम (हिमाचली ड्रग) चा ओव्हरडोज करून अशी वक्तव्ये देत आहे.
एका नॅशनल मीडिया नेटवर्कच्या वार्षिक समिटमध्ये कंगना अतिथी वक्ता होती. त्या कार्यक्रमात स्वातंत्र्य चळवळीबद्दल बोलताना कंगना म्हणाली होती की, देशाला 1947 मध्ये 'भीक' मिळाली होती आणि खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले. वीर सावरकरांबद्दल विचारलेल्या प्रश्नावर तिने काँग्रेसला ब्रिटिश राजवटीचा भाग असल्याचे सांगितले होते. कंगनाच्या या वक्तव्यानंतर बराच वाद निर्माण झाला आहे. राजकारण्यांसह बॉलिवूड सेलिब्रिटीही तिच्या अशा वक्तव्याचा निषेध करत आहेत.
कंगनाच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेनेही अभिनेत्रीविरोधात निषेध व्यक्त केला आहे. कंगनाने देशाचा अपमान केल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तिचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घेतले पाहिजेत तसेच कंगनाच्या वक्तव्यावर भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे राऊत म्हणाले आहेत.
आम आदमी पार्टीच्या प्रीती मेनन यांनी अभिनेत्रीविरोधात तक्रार दाखल केल्याचे वृत्त आहे. दिल्लीतील सत्ताधारी पक्षाने रणौतच्या वक्तव्याचा निषेध केला असून कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे. त्याचवेळी भारतीय जनता पक्षाचे वरुण गांधी यांनी ट्विट केले होते की, 'कधी महात्मा गांधींच्या बलिदानाचा आणि तपश्चर्येचा अपमान, कधी त्यांच्या मारेकऱ्याचा सन्मान, आणि आता शहीद मंगल पांडेपासून राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाष चंद्र बोसपर्यंत लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा तिरस्कार, या विचारसरणीला मी वेडेपणा म्हणावे की देशद्रोह?' (हेही वाचा: 'काही लाज लज्जा…माफी तरी मागावी', संजय राऊत यांची कंगना रनौत हिच्यावर टीका, भाजपच्या अध्यक्षांना 'मन की बात' करण्याचा सल्ला)
दरम्यान, हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील मलाना खोऱ्यात मिळणाऱ्या चरस किंवा हॅशला मलाना क्रीम म्हणतात. चरस, ज्याला हिमाचल प्रदेशातील लोक भांग म्हणूनही ओळखतात. ही वनस्पती या खोऱ्यात नैसर्गिकरीत्या वाढते आणि त्याची बेकायदेशीर शेतीही येथे केली जाते. या खोऱ्यात एकच गाव आहे ते म्हणजे मलाना.