Famous Marathi Actress in Bollywood: बॉलिवूडवर अधिराज्य गाजवत असलेल्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री
आज अशाच काही अभिनेत्रींची आपण माहिती घेणार आहोत
सध्या असे क्वचित एखादे क्षेत्र असेल जिथे मराठी मातीचा, मराठी माणसाचा डंका वाजला नसेल. राजकारण, शिक्षण, ऑटो, तंत्रज्ञान, विज्ञान, समाजकारण, वैद्यकीय अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये अनेक यशस्वी मराठी लोक दिसून येतात. यामध्ये चित्रपट असे एक क्षेत्र आहे जिथे पहिल्यापासूनच मराठी माणसाचे वर्चस्व दिसून आले आहे. 1913 मध्ये दादासाहेब फाळके यांनी पहिला चित्रपट प्रदर्शित करून सुरु झालेला या प्रवास आजही अव्याहतपणे चालू आहे. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री (Famous Marathi Actress) आहेत ज्या बॉलिवूडसह देशातील तमाम चाहत्यांच्या हृदयावर राज्य करीत आहेत. आज अशाच काही अभिनेत्रींची आपण माहिती घेणार आहोत.
मुग्धा गोडसे (Mugdha Godse)– मुग्धा गोडसे ही लोकप्रिय भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. मधुर भंडारकर यांच्या 2008 मध्ये आलेल्या ‘फॅशन’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिने जवळजवळ 15 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar)- मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये एक खास निर्माण करणारी अभिनेत्री अमृता खानविलकर मल्होत्रा हिचा जन्म 23 नोव्हेंबर 1984 रोजी मुंबईमध्ये झाला. गोलमाल, अर्जुन, फुंक, राझी, हिम्मतवाला अशा अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
सोनाली बेंद्रे (Sonali Bendre)– सोनाली बेंद्रे ही बॉलिवूडमध्ये एक लोकप्रिय तसेच आघाडीच्या अभिनेत्रीपैकी एक मराठी अभिनेत्री आहे. 1994 साली तिने ‘आग’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने सरफरोश, हम साथ साथ है, दिलजले, डुप्लीकेट, जिस देश में गंगा रहता है, हमारा दिल आपके पास है, लव के लिये कुछ भी करेगा अशा अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सोनालीला 2 राष्ट्रीय पुरस्कार पद्मश्री आणि पद्म भूषणने सन्मानित करण्यात आले आहे.
श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor)- श्रद्धा कपूर ही देखील बॉलिवूडमधील नावाजलेली अभिनेत्री असून ती मराठी आहे. श्रद्धा कपूर ही शक्ती कपूर व शिवांगी कपूर यांची मुलगी असून शिवांगी या मराठी आहेत. अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे या श्रद्धा कपूरच्या मावशी आहेत. श्रद्धा कपूर मुख्यतः आशिकी 2 मधील तिच्या अभिनयासाठी लोकप्रिय ठरली होती. त्यानंतर एक विलन, हैदर, बाग़ी, हाफ़ गर्लफ़्रेंड, हसीना: द क्वीन ऑफ़ मुम्बई अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत.
राधिका आपटे (Radhika Apte)– गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूड चित्रपट तसेच सिरीजमध्ये एक वेगळे स्थान निर्माण करणारी मराठी अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे. 1985 मध्ये पुण्यात राधिकाचा जन्म झाला. वाह लाइफ हो तो ऐसी या चित्रपटात एका छोट्या भूमिकेसह राधिकाने आपल्या करियरची सुरुवात केली होती. पार्च्ड या चित्रपटामधील बोल्ड सीनमुळे राधिका चर्चेत आली. पुढे मांझी: द माउंटेन मैन, अंधाधुन, रात अकेली है अशा चित्रपटांमध्ये तिने उत्तम भूमिका साकारल्या.
माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)- बॉलिवूडमध्ये सर्वात लोकप्रिय ठरलेली मराठी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. 80 व 90 च्या दशकामध्ये माधुरीने असा काही ठसा उमटवला ज्याने इतिहास रचला. 1984 मध्ये अबोध चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले व तेव्हा सुरु झालेला हा प्रवास अजूनही चालूच आहे. या मराठी मुलीने फक्त भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये महाराष्ट्राचे नाव उजळवले. (हेही वाचा: आलिया भट्ट-रणबीर कपूर समवेत बॉलिवूडमधील 'हे' कपल्स 2021 मध्ये होऊ शकतात विवाहबद्ध!)
उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar)– बॉलिवूड गाजवून राजकारणामध्ये प्रवेश केलेली मराठी अभिनेत्री म्हणजे उर्मिला मातोंडकर. उर्मिला मातोंडकरचा जन्म 4 फेब्रुवारी 1974 साली झाला. उर्मिलाने 1980 च्या 'कलयुग' या चित्रपटातून बाल कलाकार म्हणून फिल्मी करिअरची सुरुवात केली होती एक पूर्ण अभिनेत्री म्हणून तिने 1991 मध्ये 'नरसिम्हा' चित्रपटातून पदार्पण केले. 1995 मध्ये रंगीला, 1997 मध्ये जुदाई आणि 1998 मध्ये सत्या या तीनही चित्रपटामधील उर्मिलाच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली. तिन्ही चित्रपटांना फिल्मफेअर पुरस्कारांसाठी नामांकन देण्यात आले होते.