Dhanush Paternity Case: अभिनेता धनुष आपला मुलगा असल्याचा जोडप्याचा दावा; मद्रास उच्च न्यायालयाने अभिनेत्याला बजावले समन्स
आता या दाम्पत्याने पुन्हा एकदा हे प्रकरण उकरून काढले असून पोलीस तपासाची मागणीही केली आहे.
मद्रास उच्च न्यायालयाने (Madras High Court) दाक्षिणात्य अभिनेता धनुषविरोधात (Dhanush) समन्स बजावले आहे. हे प्रकरण बायलॉजिकल पालकांशी (Biological Parents) संबंधित आहे, ज्यात धनुष हा आपला मुलगा असल्याचा दावा एका जोडप्याने केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा खटला सुरू आहे. आता या प्रकरणी न्यायालयाने धनुषला समन्स बजावले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कथिरेसन आणि त्यांची पत्नी मीनाक्षी असे केस करणाऱ्या जोडप्याचे नाव आहे. अभिनेता धनुष हा आपला मुलगा असून काही वर्षांपूर्वी अभिनयासाठी तो घर सोडून चेन्नईला आला असल्याचा दावा या जोडप्याने केला आहे.
धनुषने पितृत्व चाचणीचे खोटे अहवाल सादर केल्याचा आरोप कथिरेसन यांनी न्यायालयात केला आहे. आपण अभिनेता धनुषचे खरे वडील असल्याचा दावा करणाऱ्या कथिरेसनने याप्रकरणी पोलीस तपासाची मागणी न्यायालयाकडे केली आहे. या पितृत्व चाचणीच्या आधारे 2020 साली हे प्रकरण रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ही चाचणी बनावट असून दोन वर्षांपूर्वी दिलेला आदेश रद्द करण्यात यावा, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली.
धनुष त्यांचा तिसरा मुलगा असल्याचा दावा या जोडप्याने त्यांच्या अपीलमध्ये केला आहे. या अपीलानंतर न्यायालयाने धनुषविरोधात नोटीस बजावली आहे. धनुषला आपला मुलगा म्हणणाऱ्या कथिरेसन आणि मीनाक्षी यांनी दरमहा 65,000 रुपये भरपाईची मागणी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धनुषने हे सर्व आरोप आधीच फेटाळले आहेत. (हेही वाचा: Tanushree Dutta Accident: अभिनेत्री तनुश्री दत्ताचा अपघात; मंदिरात जाताना गाडीचे ब्रेक झाले फेल)
धनुषने 2017 मध्ये ही केस जिंकली होती. आता या दाम्पत्याने पुन्हा एकदा हे प्रकरण उकरून काढले असून पोलीस तपासाची मागणीही केली आहे. मदुराई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने कथिरेसनची याचिका फेटाळून लावल्यानंतर आता मद्रास उच्च न्यायालयाने धनुषच्या विरोधात नोटीस जारी केली आहे.