Coronavirus: 'रोहित शेट्टी'कडून जुहू पोलिसांना विशेष खोल्यांचे वाटप; वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ व्हावळ यांनी मानले आभार
यामध्ये अनेक सेलेब्जनी आपल्या परीने मदत देऊ केली आहे.
सध्या देशावर आलेले कोरोना विषाणूचे (Coronavirus) संकट प्रशासन आपल्या परीने हाताळत आहेच, मात्र त्या प्रयत्नांना साथ देण्यासाठीही अनेक लोक पुढे आले आहेत. यामध्ये अनेक सेलेब्जनी आपल्या परीने मदत देऊ केली आहे. आता असाच मदतीचा हात पुढे केला आहे तो दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) याने. पंढरीनाथ व्हावळ (Pandharinath Wavhal), वरिष्ठ निरीक्षक, जुहू-मुंबई-पोलिस यांनी याबाबत माहिती दिली आहे. रोहितने वेळेवर मदतीला धावून येऊन, जुहू पोलिसांना विशेष खोल्यांचे वाटप केले आहे, याबाबत व्हावळ यांनी रोहित शेट्टीचे आभार मानले आहेत.
एका ट्वीटद्वारे पंढरीनाथ व्हावळ यांनी ही गोष्ट सांगितली आहे, यामध्ये ते लिहितात, ‘वेळेवर मदत करून जुहू पोलिसांना विशेष खोल्यांचे वाटप केल्याबद्दल, आपल्या या कृत्याचे मनापासून आभार. यामुळे आमच्या कुटुंबियांपासून सुरक्षित अंतर ठेवण्यास आणि त्यांना या व्हायरसचा धोका निर्माण होण्यापासून सुरक्षित राहण्यास मदत झाली. पुन्हा एकदा आपल्या या कार्याचे आणि देशाप्रती दाखवलेल्या निष्ठेबद्दल धन्यवाद.'
पहा पंढरीनाथ व्हावळ यांचे ट्वीट -
डॉक्टरांबरोबरच पोलिसही कोरोना व्हायरसबरोबर युद्धात गुंतले आहेत आणि यामुळे आतापर्यंत बरेच पोलिस या विषाणूला बळी पडले आहेत. नागरिकांच्या संरक्षणासाठी नेहमी तत्पर असलेल्या पोलिसांनाही या परिस्थितीत अनेक सुविधांची आवश्यकता आहे यात शंका नाही. अशा परिस्थितीत बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी याने पोलिसांची मागणी ओळखून त्यांच्याकडे मदतीचा हात पुढे केला. (हेही वाचा: अजय देवगणची धारावीसाठी मोठी मदत; नवीन रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडर आणि व्हेंटिलेटर केले दान)
दरम्यान, याआधी अजय देवगनने मुंबईचा प्रसिद्ध झोपडपट्टी भाग धारावीसाठी मोठी मदत केली होती. व्हायरल भयानीच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर दिलेल्या माहितीनुसार, अजय देवगणने कोणालाही कळू न देता देणगी दिली आहे. या पोस्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार- 'अजय देवगणने धारावीतील रुग्णालयांसाठी 200 बेड, ऑक्सिजन सिलिंडर आणि व्हेंटिलेटरची व्यवस्था केली आहे. बीएमसीने या झोपडपट्टीसाठी 15 दिवसांत हे कोरोना विषाणूसंबंधित स्वतंत्र रुग्णालय सुरू केले आहे. अजय देवगणमे धारावीच्या 700 कुटुंबांना रेशन किट देखील दान केले आहे.
अशाप्रकारे रोहित शेट्टी, अजय देवगण, शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार अशा अनेकांनी या कोरोना व्हायरस संकटकाळात मदतीचा हात पुढे केला आहे.