अखेर दीपिका पादुकोण च्या जेएनयू भेटीवर बोलल्या छपाक चित्रपटाच्या दिग्दर्शक मेघना गुलजार

दरम्यान, अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली असल्याने सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे.

Meghna Gulzar, Deepika Padukone (Photo Credits: Facebook)

दिल्लीतील जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसक हल्ल्याला जवळपास एक आठवडा उलटून गेला आहे. दरम्यान, अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली असल्याने सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे. काहींनी दीपिकाला सपोर्ट दर्शवला आहे तर काहींनी तिला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला व तिच्या छपाक या चित्रपटावर बहिष्कार घालायचाही निर्णय घेतला. दीपिका पादुकोणच्या या निर्णयावर छापाकच्या दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी अखेर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मेघना गुलजार यांनी PTI शी बोलताना असे म्हटले आहे कि दीपिकाचा निर्णय हा तिचा 'वैयक्तिक' होता आणि चाहत्यांनी विवादाला उत्तर देण्याऐवजी त्यांच्या चित्रपटातील कथानकाला आणि त्यातून देण्यात आलेला महत्त्वाच्या संदेश याकडे लक्ष वळविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

त्या म्हणाल्या, “वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य नेहमी वेगळे ठेवायला हवे. एखाद्या व्यक्तीने आपल्या वैयक्तिक जीवनात काय केले आणि एखाद्या चित्रपटात व्यावसायिक म्हणून काय केले आहे, याकडे स्वतंत्रपणे पाहिले जाणे आवश्यक आहे.”

JNU आंदोलनाला पाठिंबा दर्शवणाऱ्या दीपिका पादुकोण हिच्या जाहिरातींना फटका, मोठे नुकसान होण्याची शक्यता

दरम्यान, छापाक हा चित्रपट 10 जानेवारी रोजी अजय देवगणच्या तन्हाजी: द अनसंग वॉरियरसह रिलीज झाला आहे. दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाल्याने, बॉक्स ऑफिसवर तंगडी फाईट दिसून येते आहे. त्याबद्दल बोलताना मेघना म्हणाल्या, “हा वितरण करणाऱ्यांचा निर्णय आहे जो चित्रपटाच्या वितरकाने घेतला आहे. मला असे वाटते की त्यांचा असा विश्वास आहे की दोन्ही चित्रपट खूपच भिन्न असल्याने दोन्ही चित्रपटांना त्यांचे प्रेक्षक सापडतील."

मेघना पुढे म्हणाल्या, “आमचे चित्रपट रिलीज कॅलेंडर किती लोकप्रिय आहे याचा विचार करता सोलो रिलीज मिळवणे अत्यंत अवघड आहे.”