कोरोना व्हायरसच्या लढाईत प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीची मोठी मदत; नर्स बनून करत आहे रुग्णांची सेवा, मुख्यमंत्र्यांनीही केले कौतुक (Photo)
अशा काळात समाजातील विविध क्षेत्रातील लोकदेखील कोरोनाविरूद्धच्या लढ्यात सामील झाले आहे
पंतप्रधानांनी कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढण्यासाठी 21 दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करत, संपूर्ण देश बंद ठेवला आहे. अशा काळात समाजातील विविध क्षेत्रातील लोकदेखील कोरोनाविरूद्धच्या लढ्यात सामील झाले आहेत. कोणी गरिबांना अन्न वाटप करीत आहे, तर कोणी देणगी देत आहे. मदत करणाऱ्या अशाच लोकांमध्ये एक आहे बॉलीवूड अभिनेत्री शिखा मल्होत्रा (Shikha Malhotra). या लढाईमध्ये शिखा परिचारिका बनून रुग्णांची सेवा करत आहेत. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी तिने एक वर्षाचे नर्सिंगचे प्रशिक्षण घेतले आहे. आता हे प्रशिक्षण कोरोना संक्रमित रूग्णांवर उपचार करण्यासाठी कमी आले आहे आहे.
शिखाने 2014 मध्ये वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज आणि नवी दिल्लीतील सफदरगंज हॉस्पिटलमधून नर्सिंगचा कोर्स केला होता. पण अभिनयामुळे तिला नर्सिंगचा कोर्स पूर्ण करता आला नाही. त्यानंतर तिने बॉलीवूडमध्ये आपले नशीब आजमावायला सुरुवात केली. संजय मिश्रा (Sanjay Mishra) यांच्यासोबत चित्रपट कांचली (Kaanchli) मध्ये तिने मुख्य भूमिका साकारली आहे. आता सध्याच्या कठीण परिस्थितीत तिने कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांची काळजी घेण्याचे ठरविले आहे.
(हेही वाचा: COVID-19: देशात आणीबाणी लागू करा; बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी)
शिखा 27 मार्च पासून जोगेश्वरी पूर्व, मुंबई येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटलमध्ये स्वयंसेवक परिचारिका म्हणून कार्यरत आहे. शिखाचे आयसोलेशन वॉर्डमध्ये रुग्णांची काळजी घेत असलेले फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. लोक शिखाच्या निर्णयाचे प्रचंड कौतुक करत आहेत. मुख्य म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शीखाचे कौतुक केले आहे. ‘शिखा जी, या कठीण काळात आपण करत असलेली रुग्णसेवा महाराष्ट्र राज्य कधीही विसरणार नाही. आपण करत असलेल्या कार्यासाठी शुभेच्छा आणि स्वतःची काळजी घ्या.’ असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.