बर्थडे स्पेशल : 'या' पुस्तकावरुन पडले करिना कपूरचे नाव !
सैफसोबतचे लग्न आणि तैमूरचा जन्म यामुळे ती विशेष चर्चेत असतेच.
बॉलिवूडची बेबो करिना कपूर खानचा आज ३८ वा वाढदिवस आहे. आपल्या अभिनयाने आणि दिलखेचक अदांनी तिने बॉलिवूडमध्ये नाव कमावले. झीरो फिगरमुळे ही बबली गर्ल चांगलीच चर्चेत आली. सैफसोबतचे लग्न आणि तैमूरचा जन्म यामुळे ती विशेष चर्चेत असतेच. करिनाच्या फिगरचे अनेकांना कौतुक आहे. पण तिच्याबद्दलच्या या काही गोष्टी तुम्हाला ठाऊक नसलीत. तर जाणून घेऊया करिना कपूर खानविषयी...
# करिनाच्या नावामागे एक कहाणी आहे. करिनाच्या वेळेस तिची आई गर्भवती होती तेव्हा त्या अन्ना करेनीना नावाचे पुस्तक वाचत होत्या आणि त्यावरुनच तिचे नाव करिना पडले. पण घरी लाडाने तिला सर्वच बेबो म्हणतात. आता ती बॉलिवूडचीही बेबो झाली आहे.
# करिनाचा जन्म 21 सप्टेंबर 1980 मध्ये मुंबईत झाला.
# लहानपणापासूनच तिने घरातील फिल्मी वातावरण अनुभवले. संपूर्ण कपूर कुटुंबच फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत असल्याने ती त्याच वातावरणात लहानाची मोठी झाली. अभिनेत्री बबिता आणि अभिनेता रनधीर कपूर यांची ही धाकटी लेक. तर अभिनेते, निर्माते राज कपूर यांची नात आहे आणि पृथ्वीराज कपूर हे तिचे पणजोबा आहेत.
# करिश्मा कपूर आणि करिना कपूर या दोघी बहिणींनी सिनेसृष्टीत उत्तम कामगिरी केली. दोघींचे नातेही अतिशय घट्ट आहे.
# मुंबईतील जमनाबाई स्कूलमधून तिने शिक्षणाला सुरुवात केली. त्यानंतर डेहारादूनच्या वेलहम गर्ल्स बोर्डिंग स्कूलमध्ये तिला पाठवण्यात आले. तिथून परतल्यावर मुंबईच्या मिठीबाई कॉलेजमध्ये तिने अॅडमिशन घेतले. पण पदवी घेतल्याशिवायच तिने दोन वर्षात कॉलेजला रामराम ठोकला.
# मग तिने अमेरिकेतील प्रसिद्ध हार्वर्ड युनिव्हर्सिटीत प्रवेश केला. कंम्प्युटरचा तीन महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स केल्यानंतर तिला लॉ करण्याची इच्छा झाली. त्यासाठी तिने चर्चगेट येथील सरकारी लॉ कॉलेजला अॅडमिशन घेतले. मात्र तिने ते ही पूर्ण केले नाही आणि अभिनयाकडे वळली.
# राकेश रोशनच्या 'कहो ना प्यार है' सिनेमातून करिना बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार होती. तिने काही शूटिंगही पूर्ण केले होते. पण अचानक तिला हा सिनेमा सोडावा लागला. याचे कारण मात्र अजूनही गुलदस्तातच आहे.
# त्यानंतर करिनाने जेपी दत्ताच्या 'रिफ्यूजी' सिनेमातून अभिषेक बच्चनसोबत डेब्यू केला. सिनेमाला विशेष यश मिळाले नसले तरी करिनाच्या अभिनयाचे मात्र खूप कौतुक झाले. या सिनेमासाठी तिला फिल्मफेअरचा बेस्ट फिमेल डेब्यूचा पुरस्कारही मिळाला.