Badshah Paid for Fake Views: गायक बादशाहची मोठी कबुली- 'आपल्या 'पागल' गाण्याच्या 72 लाख व्ह्यूजसाठी दिले 74 लाख रुपये'

Ltd.) ला 74,26,370 रुपये दिले.

Rapper Badshah (Photo Credits-Instagram)

गेल्या वर्षी, मुंबई पोलिसांनी एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. सेलिब्रिटी आणि इन्फ्ल्यूएंसर्सचे सोशल मीडिया फॉलोअर्स वाढवण्यासंबंधी हे रॅकेट होते. या प्रकरणात गायक-रॅपर बादशाहचेही (Singer Badshah) नाव पुढे आले होते. बादशाहचे 'पागल' हे गाणे 11 जुलै रोजी सोनी म्युझिकच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज झाल्यानंतर पुढील 24 तासांत यूट्यूबवर 7.5 कोटी वेळा पाहिले गेले आहे. यामुळे 'पागल' हे 24 तासांत जगातील सर्वाधिक पाहिले गेलेले गाणे ठरले. यानंतर बादशाहवर त्याच्या 'पागल' गाण्यासाठी व्ह्यूज विकत घेतल्याचे आरोप झाले होते. आता या प्रकरणी 446 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

बादशाहने 74 लाख रुपये देऊन त्याच्या गाण्यासाठी 72 लाख व्ह्यूज विकत घेतल्याचे यामध्ये सांगण्यात येत आहे. या आरोपपत्रात 11 पंच, 25 साक्षीदार आणि पाच आरोपींची नावे आहेत. पाचपैकी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर बादशाह आणि अभिनेत्री कोयना मित्रा हे या प्रकरणात साक्षीदार आहेत.

गायिका भूमी त्रिवेदी हिने मुंबई पोलिसांकडे तक्रार केल्यावर या प्रकरणाला सुरुवात झाली. भूमीची तक्रार होती की काही अज्ञात व्यक्ती इन्स्टाग्रामवर तिच्या नावाची फेक आयडी बनवून लोकांशी संपर्क साधत आहेत. प्राथमिक तपासानंतर हे प्रकरण क्राइम इंटेलिजन्स युनिटकडे वर्ग करण्यात आले. तेव्हा त्या टीमचे नेतृत्व सचिन वाढे करत होते. त्यानंतर यामध्ये पैसे देऊन फॉलोअर्स घेणे किंवा व्ह्यूज मिळवणे असे प्रकारही सर्र्रास घडत असल्याचे समोर आले.

मिड-डेच्या वृत्तानुसार, या प्रकरणी सचिन यांना दिलेल्या निवेदनात बादशाहने सांगितले की, त्याचे गाणे सोनी म्युझिक इंडियाच्या वाहिनीवर प्रसारित होणार होते. त्याने हे गाणे रेकॉर्ड करून सोनी म्युझिकला दिले. तसेच बादशाहने कबुल केले की, त्याने गाण्याचे प्रमोशन करणारी कंपनी क्युकी डिजिटल मीडिया प्रायव्हेट लिमिटेड (Qyuki Digital Media Pvt. Ltd.) ला 74,26,370 रुपये दिले. सोनी म्युझिकचे पवनेश पंजू यांच्याशी झालेल्या संवादानंतर बादशाहने हे पाऊल उचलले असेही यामध्ये समोर आले. (हेही वाचा: Rhea Chakraborty ला कोर्टाने दिला दिलासा, बँक खाती होणार डीफ्रीज)

या प्रकरणातील आरोपी एथिकल हॅकर प्रेमेंद्र शर्माने ‘मिड-डे’ला सांगितले की, त्याने अशाप्रकारे पैसे घेऊन 7-8 जणांचे फॉलोअर्स वाढवले ​​आहेत. प्रेमेंद्र व्यतिरिक्त या प्रकरणात अभिषेक डावडे, काशिफ मन्सूर आणि विजय बंठिया अशी अन्य आरोपींची नावे आहेत. या सर्व लोकांना अटक करण्यात आली आहे. मात्र तबिश अली मीर नावाचा आरोपी अद्याप फरार आहे.