Atal Film Motion Poster: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कहाणी मोठ्या पडद्यावर; समोर आले मोशन पोस्टर; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित (Watch Video)
हा चित्रपट अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर लिहिलेल्या 'द अनटोल्ड वाजपेयी' या पुस्तकावर आधारित असेल. हा एक पॉलिटिकल ड्रामा आहे, ज्याचे शूटिंग पुढच्या वर्षी सुरू होणार आहे.
देशाचे माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याची सुरुवात, पुढील वर्षी डिसेंबरमध्ये त्यांच्यावर तयार होणाऱ्या एका हिंदी चित्रपटाने होणार आहे. 25 डिसेंबर 1924 रोजी ग्वाल्हेरमध्ये जन्मलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या ‘बायोपिक’चे नाव 'अटल' असून, विनोद भानुशाली आणि संदीप सिंग हे दोन दिग्गज चित्रपट निर्माते या प्रकल्पासाठी एकत्र आले आहेत. याआधी संदीप सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक 'पीएम नरेंद्र मोदी' बनवला आहे. 'अटल' चित्रपटाचे दिग्दर्शक आणि चित्रपटात अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराची लवकरच घोषणा होणार आहे.
मंगळवारी संदीप सिंह यांनी चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करून याबाबत माहिती दिली. यासोबतच हा चित्रपट पुढील वर्षी अटलबिहारी वाजपेयी यांच्या 99 व्या जयंतीनिमित्त, म्हणजेच 25 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 'अटल'च्या मोशन पोस्टरमध्ये अटलबिहारी वाजपेयींचे शब्द ऐकू येत आहेत, ज्यामध्ये ते म्हणतात- 'सत्तेचा खेळ चालेल, सरकारे येतील-जातील, पक्ष बनतील आणि बिघडतील, पण हा देश राहिला पाहिजे, या देशाची लोकशाही अमर राहिली पाहिजे.’
'अटल' हा चित्रपट हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर लिहिलेल्या 'द अनटोल्ड वाजपेयी' या पुस्तकावर आधारित असेल. हा एक पॉलिटिकल ड्रामा आहे, ज्याचे शूटिंग पुढच्या वर्षी सुरू होणार आहे. दरम्यान, अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी ग्वाल्हेर येथे झाला. ते एका शिक्षकाचे पुत्र होते. पत्रकारितेपासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांना कविता लिहिण्याचाही छंद होता. अटलजींनी शिक्षणादरम्यान आरएसएसमध्ये प्रवेश केला आणि तेथून ते राजकारणाकडे वळले. (हेही वाचा: Ananya Trailer: आकाशाला गवसणी घालणाऱ्या 'अनन्या’चा ट्रेलर प्रदर्शित, हृता दुर्गुळे मुख्य भूमिकेत)
ते तीन वेळा देशाचे पंतप्रधान होते. अटलजी हे एक उत्तम वक्ते मानले जायचे आणि केवळ सामान्य जनताच नाही तर विरोधकही त्यांची भाषणे ऐकण्यासाठी त्यांच्या सभांना जात असत. 2018 मध्ये वयाच्या 93 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.