Ajaz Khan Arrested by NCB: बिग बॉस फेम अभिनेता एजाज खानला ड्रग प्रकरणात एनसीबीकडून अटक; छापेमारीत मिळाल्या गोळ्या
जेव्हा एजाजला पकडले गेले, तेव्हा तो नशेत होता.
प्रसिद्ध अभिनेता आणि बिग बॉसचा माजी स्पर्धक एजाज खानला (Ajaz Khan) मोठा धक्का बसला आहे. ड्रग्ज (Drug) प्रकरणात एनसीबीने (NCB) एजाज खान याला अटक केली आहे. काल एजाजला ताब्यात घेण्यात आले. काल संध्याकाळी एजाजच्या घरावर छापा टाकल्यावर काही गोळ्याही ताब्यात घेण्यात आल्या. ड्रग्ज पेडलर शादाब बटाटा याला अटक झाल्यानंतर अभिनेता एजाज खानचे नाव समोर आले होते. 8 तासांच्या दीर्घकाळ चौकशीनंतर एजाजला अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला. अटकेनंतर एजाज खानला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले.
एजाज खान राजस्थानातून मुंबईत परतल्यानंतर काल एनसीबीने त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला आज अटक करण्यात आली. एजाज खानवर बटाटा टोळीचा भाग असल्याचा आरोप आहे. एनसीबीची टीम एजाजच्या अंधेरी आणि लोखंडवाला इथल्या अनेक ठिकाणी छापे टाकत आहे. एनसीबीने मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज पुरवठा करणारा फारुख बटाटाचा मुलगा शादाब बटाटा याला अटक केली आणि त्याच्याकडून सुमारे दोन कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले.
मुंबईत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना ड्रग्ज पुरविल्याचा आरोप शादाब बटाटावर आहे. फारुख लहान वयात बटाटे विकत असे. त्यावेळी तो अंडरवर्ल्डमधील काही लोकांच्या संपर्कात आला आणि आता तो मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज पुरवठा करणारा आहे.
दरम्यान, याआधी एजाजला मुंबईच्या अँटी-नारकोटिक्स सेलने 2018 मध्ये, एका हॉटेलमधून बंदी घातलेल्या आठ ड्रग्जसह ताब्यात घेतले होते. जेव्हा एजाजला पकडले गेले, तेव्हा तो नशेत होता. त्यांच्याकडून 2.2 लाख रुपये किंमतीची आठ बंदी घातलेली एक्स्टसी टॅबलेट जप्त करण्यात आली होती, ज्यांचे वजन 2.3 ग्रॅम होते. (हेही वाचा: दारुच्या नशेत असताना अभिनेता अजय देवगन ला दिल्लीत मारहाण? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमागील सत्य जाणून घ्या)
जूनमध्ये अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर एनसीबीने बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनची चौकशी सुरू केली. तपासणीत काही व्हॉट्सअॅप चॅट्स उघडकीस आले होते. ज्यात सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि तिचे कर्मचारी ड्रग्जविषयी बोलताना पकडले गेले. यानंतर बॉलिवूडमध्ये ड्रग्जचे मोठे रॅकेट उघडकीस आले.