1962 The War In The Hills Trailer: भारत-चीन युद्धाची गाथा लवकरच Disney+Hotstar वर; पहा देशभक्तीने भारलेल्या '1962 द वॉर इन द हिल्स'चा ट्रेलर (Watch Video)
‘1962 - वॉर इन द हिल्स’मध्ये अभय देओलशिवाय माही गिल, सुमित व्यास, आकाश ठोसर, रोहन गंडोत्रा, रोशल राव, हेमल इंगळे, सत्य मांजरेकर आणि अनूप सोनी असे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसतील. आकाश ठोसर या सिरीजमध्ये 'किशन' नावाची भूमिका सकारात आहे.
डिस्ने प्लस हॉटस्टार (Disney+Hotstar) वर प्रदर्शित होणारी बहुप्रतीक्षित वेब सिरीज ‘1962: द वॉर इन द हिल्स' (1962 The War In The Hills) चा ट्रेलर समोर आला आहे. भारत-चीन युद्धावर आधारित ही सिरीज 26 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर लॉन्चवेळी सिरीजचे दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले की, या सिरीजची धाटणी ही एखाद्या चित्रपटाप्रमाणे आहे. या सिरीजमध्ये अभय देओल प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तांत्रिक अडचणीमुळे अभय देओल ट्रेलरच्या व्हर्चुअल प्रक्षेपण कार्यक्रमात उपस्थित राहू शकला नाही. अभय सिरीजमध्ये मेजर सूरजसिंगची भूमिका साकारत आहे.
मेजर सूरजसिंग यांची बटालियन सी-कंपनीने 1962 मध्ये लडाखच्या दुर्गम भागात 3000 चीनी सैनिकांशी लढा दिला होता. या युद्धाची खास बाब म्हणजे केवळ 125 भारतीय सैनिक चिनी सैन्याशी लढले होते, त्यापैकी 123 शहीद झाले होते. या शूरवीरांच्या धाडसाची कहाणी या सिरीजमध्ये दिसणार आहे. ट्रेलरमध्ये सिरीज कोणत्या प्रकारची आणि कशी असेल याचा एक अंदाज येतो. यातील लडाखसाठी भारत आणि चीनमधील युद्धाचे प्रसंग पाहून अक्षरशः अंगावर काटा येतो. ट्रेलरमध्ये काही सुंदर शॉट्स दाखवण्यात आले आहेत जे पाहून या सिरीजची भव्यता दिसून येते.
‘1962 द वॉर इन द हिल्स’मध्ये अभय देओलशिवाय माही गिल, सुमित व्यास, आकाश ठोसर, रोहन गंडोत्रा, रोशल राव, हेमल इंगळे, सत्य मांजरेकर आणि अनूप सोनी असे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसतील. आकाश ठोसर या सिरीजमध्ये 'किशन' नावाची भूमिका सकारात आहे. किशन हा मेजर सूरज सिंग यांच्या नेतृत्वातील बटालियनचा एक भाग आहे. ही भूमिका त्याच्यासाठी ड्रिम रोल होता असे आकाशने याआधी सांगितले होते. (हेही वाचा: 1962 The War In The Hills वेब सिरिजमधून महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर करणार डिजिटल डेब्यू)
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सांगितल्याप्रमाणे सैनिकही माणसे आहेत आणि त्यांनाही भावना आहेत म्हणून ही सिरीज फक्त युद्धापुरती मर्यादीत नसून सैनिक व त्यांच्या कुटूंबावरही ती फोकस करते.
(The above story first appeared on LatestLY on Feb 15, 2021 06:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

