Pulwama Terror Attack: 'अखिल भारतीय सिने कामगार संघटने'कडून पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी
या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता कोणत्याही चित्रपटात पाकिस्तानी कलाकार अथवा म्युझिक व्हिडिओमध्ये पाकिस्तानी गायक सहभागी होऊ शकणार नाहीत.
पुलवामा हल्ल्या (Pulwama Terror Attack)मुळे देशात संतापाची लाट पसरली आहे. या गोष्टीचा निषेध म्हणून केंद्र सरकारने आक्रमक पावले उचलायला सुरुवात केली आहे. सोशल मिडीयावरूनही लोक आपला निषेध व्यक्त करत आहेत. पाकिस्तानच्या पाठींब्याशिवाय इतके मोठे पाऊल उचलणे शक्य नाही, हे ओळखून शक्य तितक्या प्रमाणात पाकिस्तानची कोंडी करायची अशी भूमिका भारताने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता कोणत्याही चित्रपटात पाकिस्तानी कलाकार अथवा म्युझिक व्हिडिओमध्ये पाकिस्तानी गायक सहभागी होऊ शकणार नाहीत, अशी भूमिका 'अखिल भारतीय सिने कामगार संघटना' (AICWA) ने घेतली आहे. तरी कोणत्या संस्थेने पाकिस्तानी कलाकारांना घेतले, तर त्यांच्यावर AICWA कडून बंदी घालण्यात येईल आणि कडक कारवाई केली जाईल असा इशारा संघटनेने दिला आहे.
शहीद जवानांना काल फिल्मसिटीत श्रद्धांजली वाहण्यात आली. दुपारी 2 ते 4 या दोन तासांसाठी चित्रीकरण बंद ठेवण्यात आले. इतर कलाकारांसोबत क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण, हरभजन सिंग आणि सुरेश रैना हेही फिल्मसिटीत उपस्थित हेते. यावेळी पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालत, ‘पाकिस्तानी कलाकाराला कोणत्याही चित्रपटात घेतल्यास त्याचे शूटिंग होऊ दिले जाणार नाही. तसेच कोणत्याही म्यूझिक कंपनीने पाकिस्तानी गायकाला घेतले तर गाणे प्रदर्शित होऊ दिले जाणार नाही’, असा इशारा फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजनेही दिला आहे. (हेही वाचा : केंद्र सरकारची मोठी कारवाई; आता पाकिस्तानकडून येणाऱ्या गोष्टींवर लागणार 200 टक्के सीमा कर)
याबाबतीत ‘मनसे’ही आक्रमक झाली आहे, पाकिस्तानी गायकांशी कोणताही करार करू नका, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. दरम्यान भूषण कुमार यांची लोकप्रिय कंपनी टी-सीरिज (T-Series) ने नुकतेच राहत फतेह अली खान व आतिफ अस्लम अशा आघाडीच्या पाकिस्तानी गायाकांसोबत दोन गाण्यांसाठी करार केला होता. मात्र, मनसेच्या इशाऱ्यानंतर कंपनीने यू-ट्यूब चॅनेलवरून त्यांची गाणी तात्काळ हटवली आहेत.