मानाच्या Oscar Academy मध्ये सामील होणार भारतीय कलाकार; अनुपम खेर, झोया अख्तर, अनुराग कश्यप यांना निमंत्रण
यावर्षी भारतामधून चित्रपट निर्माती-दिग्दर्शक झोया अख्तर (Zoya Akhtar), अनुराग कश्यप (Anurag Kashyap), रितेश बत्रा आणि जेष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांचा समावेश या यादीमध्ये करण्यात आला आहे.
चित्रपट उद्योगाशी संबंधित सर्वात प्रतिष्ठित ‘ऑस्कर अकादमी’ने (Oscar Academy) त्याची नवीन सदस्य यादी घोषित केली आहे. यावेळी तब्बल 842 कलाकार यामध्ये सामील झाले आहेत. यावर्षी भारतामधून चित्रपट निर्माती-दिग्दर्शक झोया अख्तर (Zoya Akhtar), अनुराग कश्यप (Anurag Kashyap), रितेश बत्रा आणि जेष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांचा समावेश या यादीमध्ये करण्यात आला आहे. या सर्वांना अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसचे सदस्य म्हणून आमंत्रित केले गेले आहे. ही माहिती ऑस्करच्या अधिकृत वेबसाइटवर दिली गेली आहे.
ऑस्करच्या अधिकृत वेबसाइटनुसार, ज्या लोकांना निमंत्रण दिले गेले आहे त्यांनी थिएट्रिकल मोशन पिक्चर्समध्ये आपले योगदान देऊन, काही भरीव कामगिरी केली आहे. ऑस्कर 2019 या श्रेणीत 50 टक्के महिला असणार आहेत, 29 टक्के कृष्णवर्णीय असणार आहेत. हे सर्व लोक 59 देशांचे प्रतिनिधीत्व करतील. जे लोक हे आमंत्रण स्वीकारतील त्यांनाच 2019 मध्ये ऑस्कर अकादमीचा सदस्य म्हणून निवडण्यात येईल. (हेही वाचा: जेव्हा कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडले होते 52 ऑस्कर पुरस्कार; हॉलीवूडमध्ये माजला होता हाहाकार)
ऑस्कर अकादमीमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केलेल्या नवीन कलाकारांमध्ये 21 ऑस्कर विजेते कलाकार आहेत. लेडी गागा, क्रिस्टोफर मिलर, फिल लॉर्ड आणि जिमी चिन हे ऑस्कर विजेते आहेत. याआधी भारताकडून ऑस्कर अकादमीमध्ये सामील होण्यासाठी शाहरुख खान, प्रियंका चोप्रा, आदित्य चोप्रा, तब्बू आणि अनिल कपूर यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावर्षी झोया अख्तर यांना दिग्दर्शक मंडळात, अनुपम खेर यांना अभिनय मंडळात, अनुराग कश्यप यांना लघुपट आणि एनीमेशन तर रितेश बत्रा यांना लेखक म्हणून निमंत्रित केले आहे.