अफझल गुरु बळीचा बकरा; आलियाची आई सोनी राझदान यांचे वादग्रस्त ट्विट
2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यातील दोषी अफझल गुरु (Afzal Guru) याच्या फाशीला आता 7 वर्षे उलटून गेल्यावर आज बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिची आई सोनी राझदान (Soni Razdan) हिने एक नवे वादग्रस्त विधान केले आहे
2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यातील दोषी अफझल गुरु (Afzal Guru) याच्या फाशीला आता 7 वर्षे उलटून गेल्यावर आज बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिची आई सोनी राझदान (Soni Razdan) हिने एक नवे वादग्रस्त विधान केले आहे. अफझल गुरु याच्यावर सुरु असणाऱ्या खटल्यातील एक महत्वाचा भाग म्हणजे डीसीपी देविंदर सिंह (DCP Devinder Singh) यांच्यावर लावण्यात आलेले आरोप. काही दिवसांपूर्वी अफझल गुरु याची पत्नी तबस्सुम हिने सुद्धा दविंदर सिंह यांनी आपल्या पतीच्या सुटकेसाठी 1 लाख रुपये मागितल्याचा दावा केला होता, यावरून चौकशी करताना देविंदर सिंह यांना निलंबीत देखील करण्यात आले होते, आता देविंदर सिंह यांच्या अटकेनंतर हा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. संसदेवरील हल्ल्याच्या संबंधित काही महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या.
अफझल गुरु याच्या फाशीवर प्रश्न करत, "कोणत्याही व्यक्तीसाठी मृत्युदंडाची शिक्षा ही अत्यंत विचार करून द्यायला हवी, अन्यथा निर्दोष असूनही केवळ उत्साहात एखाद्याच्या जीवाशी खेळ होऊ शकतो, आणि मेलेल्या व्यक्तीला पुन्हा आणणे शक्य होत नाही, अशाच प्रकारातून, अफजल गुरूला बळीचा बकरा बनविले गेले आहे,आणि याचीही चौकशी होणे गरजेचे आहे असे सोनी राझदान यांनी म्हंटले आहे.
सोनी राझदान यांच्या ट्विट नंतर मात्र नेटकऱ्यांनी त्यांना दहशवाद्याची पाठराखण करताय का? असा सवाल केला होता. ज्यावर पुन्हा स्पष्टीकरण देत, सोनी यांनी "तो निष्पाप आहे असे कोणी म्हणत नाही. परंतु जर त्याच्यावर छळ करून त्याला हे कृत्य करण्याची आज्ञा दिली गेली असेल तर याप्रकरणाचा पूर्ण तपास अगोदरच व्हायला हवा होता, आता माणूस गेल्यावर त्याचा काय उपयोग? म्ह्णूनच फाशीची शिक्षा ही विचारपूर्वक दिली गेली पाहिजे. असे म्हंटले आहे.
सोनी राझदान ट्विट
दरम्यान, अफझल गुरु याला 9 फेब्रुवारी 2013 रोजी तिहार जेल मध्ये फाशी देण्यात आली होती. यापूर्वी त्याने डीसीपी दविंदर सिंह यांच्याबाबत अनेक खुलासे केले होते. सोमवारी जम्मू काश्मीर प्रशासनाने दविंदर सिंह यांचे मेडल्स आणि प्रशस्तिपत्रक जप्त केले. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.