The Kashmir Files चित्रपटाचे दिग्दर्शक Vivek Agnihotri विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल; 'भोपाळी म्हणजे Homosexual' हे वक्तव्य भोवले (Watch Video)

यानंतर त्याच्याविरुद्ध मुंबईतील वर्सोवा येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. विवेक अग्निहोत्री यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Vivek Agnihotri (File Image)

'द कश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) गेल्या अनेक आठवड्यांपासून अनेक ठिकाणी आपल्या चित्रपटाबाबत मुलाखती देत आहेत. या दरम्यानची त्यांची अनेक वक्तव्ये चर्चेत आली आहेत. आताही त्यांच्या अशाच एका विधानाबाबत वाद सुरु आहे. विवेक यांनी ‘भोपाळी’ लोकांना ‘समलैंगिक’ (Gay) म्हटले होते. यानंतर त्याच्याविरुद्ध मुंबईतील वर्सोवा येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. विवेक अग्निहोत्री यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विवेक अग्निहोत्रीच्या या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ते म्हणतात. ‘मी भोपाळमध्ये मोठा झालो आहे पण मी भोपाळी नाही. कारण भोपाळीचा एक वेगळाच अर्थ आहे. मी तुम्हाला कधीतरी खाजगीत समजावून सांगेन. एका भोपाळीला विचारा. भोपाली म्हणजे समलैंगिक, नवाबी हा छंद आहे'. विवेक अग्निहोत्रीचे हे वक्तव्य समोर येताच ते ट्रोल होऊ लागले. विवेक अग्निहोत्री यांच्या वक्तव्याचा राजकीय वर्तुळातही निषेध होऊ लागला. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी त्यांच्या या वक्तव्यावर टीका केली.

यानंतर विवेक अग्निहोत्रीविरुद्ध मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रोहित पांडे नावाच्या व्यक्तीने ही तक्रार दाखल केली आहे. भोपाळच्या अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी विवेक अग्निहोत्री यांनी भोपाळीची व्याख्या भोपाळ येथील रहिवाशांचा अपमान केल्याचे म्हटले आहे. यासोबतच विवेक यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. ‘हे अत्यंत आक्षेपार्ह आहे, याकडे लक्ष द्यायला हवे’, असे एका ज्येष्ठ पत्रकाराने लिहिले आहे. (हेही वाचा: 'द काश्मीर फाइल्स' पाहण्यासाठी आलेल्या महिलांचे भगवे स्कार्फ पोलिसांनी काढले, पोलिसांनकडून महिलानां नोटीस)

सोशल मीडियावर समोर आलेली व्हिडिओ क्लिप विवेक अग्निहोत्रीच्या 17 फेब्रुवारी रोजीच्या यूट्यूबवरील सुमारे एक तासाच्या मुलाखतीचा भाग आहे. दरम्यान, विवेक अग्निहोत्रीच्या 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींची कमाई केली आहे. काहींना हा चित्रपट खूप आवडला आहे, तर काहींनी विवेकचा हा चित्रपट एका विशिष्ट धर्मापासून प्रेरित असल्याचे सांगितले आहे.