जागतिक कार्यक्रमात चक्क दोन हॅकर्सचा गौरव; 2 कोटी रूपये कॅश आणि 46 लाख रुपयांची कार बक्षीस
ही कार हॅक करताच येणार नाही असा दावा कंपनीने केला होता
सध्या हॅकर्सनी संपूर्ण जगाला त्रासले आहे. असे एकही क्षेत्र उरले नाही जिथे हॅकर्सनी आपला ठसा उमटवला नाही. यामुळेच आजकाल तर लोक बँकेत पैसे ठेवायलाही धजावत नाहीत. असे असताना Pwn2own या कंपनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हॅकर्सचा चक्क गौरव करण्यात आला आहे. इतकेच नाही तर या दोन हॅकर्सना 2 कोटी रूपये कॅश आणि एक 46 लाख रूपये किंमतीची कार बक्षीस म्हणून देण्यात आली आहे. सध्या या दोन हॅकर्सचे जगातून कौतुक होत आहे.
तर वाऱ्याच्या वेगाने धावणारी टेस्ला कार ही गेल्या काही आठवड्यांपासून चर्चेत आहे. इलेक्ट्रॉनिक कारच्या विश्वात क्रांती घडवणारी कार कंपनी म्हणून टेस्ला (Tesla) मोटर्सकडे पहिले जाते. Pwn2own या कंपनीने एक कार्यक्रम आयोजित केला होता, जिथे मोठमोठ्या हॅकर्सना बोलावले जाते आणि त्यांना चर्चेत असलेले इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स हॅक करण्याचे चॅलेन्ज दिले जाते. या कार्यक्रमात Amat Cama आणि Richard Zhu या दोन तरुणांनी टेस्लाच्या मॉडेल 3 या कारची सुरक्षा प्रणाली हॅक केली आहे. ही कार हॅक करताच येणार नाही असा दावा कंपनीने केला होता. (हेही वाचा: मॉडेल 3 कारसह, 7.10 कोटी रुपये जिंकण्याची संधी; फक्त करावे लागेल एक काम)
या दोघांनी इंटरनेट ब्राऊजरच्या माध्यमातून टेस्लाची मॉडल 3 कार हॅक केली. टेस्लाची कार हॅक करण्यासोबतच केवळ चार मिनिटांमध्ये त्यांनी सफारी ब्राउजर ही कार सुद्धा हॅक केली. टेस्लाने केलेल्या दाव्यानुसार या कामगिरीसाठी या दोन तरुणांना 2.6 कोटी रूपयांचे बक्षिस आणि 46 लाख रूपयांची टेस्ला कार मिळाली आहे.