Tata Nexon EV Fire: देशात पहिल्यांदाच इलेक्ट्रिक कारला लागली आग; मुंबईमध्ये टाटा नेक्सॉनच्या गाडीने घेतला पेट (Watch Video)
या घटनेनंतर कार निर्मात्यांनी या घटनेबद्दल आणि त्याच्या पुढील कृतीबद्दल एक निवेदन जारी केले आहे.
भारतामध्ये याआधी इलेक्ट्रिक स्कूटरला (Electric Scooter) आग लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामध्ये काही जणांचा मृत्यूही झाला आहे. आता भारतात इलेक्ट्रिक कारला (Electric Car) आग लागण्याची पहिली घटना समोर आली आहे. टाटाची लोकप्रिय आणि सर्वाधिक विक्री होणारी SUV Tata Nexon ला ही आग लागली आहे. ही घटना मुंबईमध्ये 22 जून रोजी रात्री वसई पश्चिम, पंचवटी हॉटेलजवळ घडली. आता टाटा नेक्सॉनला आग लागल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. Tata Nexon EV ही सध्या देशातील सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार म्हणून ओळखली जाते.
या कारला लागलेल्या आगीमुळे भारतात विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षेबाबत नव्या वादाला तोंड फुटले आहे. या घटनेनंतर कार निर्मात्यांनी या घटनेबद्दल आणि त्याच्या पुढील कृतीबद्दल एक निवेदन जारी केले आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मुंबईच्या पश्चिम वसई परिसरातील एका रेस्टॉरंटच्या बाहेर पांढऱ्या रंगाची टाटा नेक्सॉन ईव्ही पेट घेत आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान ही आग विझवण्याचा आणि परिसरातील वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अद्याप या आगीचे कारण समजू शकलेले नाही.
टाटा मोटर्सने बुधवारी एक निवेदन जारी करून Nexon EV आगीच्या कारणाचा तपास करण्याचे आश्वासन दिले. कार निर्मात्याने सांगितले की, ‘सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या Tata Nexon EV च्या आगीच्या घटनेची सत्यता पडताळून पाहण्यासाठी सविस्तर तपास केला जात आहे. आम्ही आमच्या सखोल चौकशीनंतर तपशीलवार प्रतिक्रिया शेअर करू.’
ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनीही हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत म्हटले आहे की, ईव्हीला आग लागण्याच्या घटना असामान्य नाहीत आणि जागतिक स्तरावरही अशा बातम्या समोर आल्या आहेत. (हेही वाचा: Ola आणि Okinawa नंतर आता Pure EV च्या इलेक्ट्रिक स्कूटरला लागली आग; सरकारने दिले चौकशीचे आदेश)
दरम्यान, सर्वात प्रथम पुण्यात ओला इलेक्ट्रिक S1 प्रो स्कूटरला आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर ओकिनावा ऑटोटेक, प्युअर ईव्ही सारख्या मोठ्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकी गाड्यांनाही आगी लागल्या. अशा घटनांमध्ये किमान 6 जणांचा मृत्यू झाला आहे. इलेक्ट्रिक टू-व्हीलरमध्ये आग लागण्याच्या घटनांची चौकशी करण्यासाठी केंद्राने मार्चमध्ये तज्ञांचे एक पॅनेल तयार केले होते. हे पॅनेल आपल्या अहवालासोबत अशा आगीच्या घटना कमी करण्यासाठी उपाययोजना सुचवेल.