भारतातील 'या' दिग्गज कार निर्माता कंपनीला लागले ग्रहण; गेल्या 9 महिन्यात फक्त 1 कार विकली गेली

याचा सर्वात जास्त फटका बसला आहे तो वाहन क्षेत्राला. सध्या वाहनांची विक्री थांबली आहे, वाहनांची निर्मिती थांबली आहे, नोकऱ्या जात आहेत. सरकार अजूनही यावर उपाययोजना करतच आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

देशात सध्या अनेक क्षेत्रात आर्थिक मंदी चालू आहे. याचा सर्वात जास्त फटका बसला आहे तो वाहन क्षेत्राला. सध्या वाहनांची विक्री थांबली आहे, वाहनांची निर्मिती थांबली आहे, नोकऱ्या जात आहेत. सरकार अजूनही यावर उपाययोजना करतच आहे. अशात दिग्गज वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सच्या (Tata Motors) नॅनोची (Tata Nano) विक्री सर्वात जास्त रखडली आहे. गेल्या 9 महिन्यात फक्त एक नॅनो विकली गेली आहे. फेब्रुवारीमध्ये शेवटची नॅनो गाडी विकली गेली होती.

सध्या टाटाने नॅनोचे उत्पादन पूर्णतः थांबवले आहे, मात्र या कारची निर्मिती पूर्णतः थांबल्याची घोषणा अजूनतरी केली गेली नाही. नॅनोच्या भविष्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. कार उत्पादन योजना मागणी हे आधीचे साठे आणि नियोजित कार्यक्षमतेवर आधारित असतात. मात्र टाटा मोटर्सने हे कबूल केले आहे की, नॅनोचा सध्याचा फॉर्म नवीन सुरक्षा नियम आणि बीएस-सहावी उत्सर्जन मानके पूर्ण करू शकणार नाही.

(हेही वाचा: बजाज कंपनीच्या Pulsar आणि Avenger बाईकच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या)

कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी सप्टेंबरमध्ये नॅनोचे उत्पादन आणि विक्री देशांतर्गत बाजारात अजिबात झाली नाही. टाटा मोटर्सने नॅनोचे गेल्या 9 महिन्यात एकही उत्पादन घेतले नाही. तसेच 2020 मध्ये कंपनी या गाडीचे उत्पादन पूर्णतः थावणार असल्याचे संकेत आधीच मिळाली आहेत.

टाटा मोटर्सने सर्वप्रथम ऑटो एक्सपो (2008) मध्ये नॅनोला लाँच केले होते. काही दिवसांतच या कारला खूप लोकप्रियता मिळाली होती. मात्र हे वाहन अपेक्षा पूर्ण करू शकले नाही आणि बघता बघता या कारची विक्री कमी होत राहिली. गेल्या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर या काळात टाटा मोटर्सने 297 नॅनो कारचे उत्पादन केले आणि 299 मोटारींची विक्री स्थानिक बाजारात केली होती.