Ola Electric Scooter: ओलाची मोठी कामगिरी; पहिल्याच दिवशी विकल्या 600 कोटी रुपयांच्या इलेक्ट्रिक स्कूटर

लोकांनी अशा गाड्यांचा लाभ घेऊन भारताला फक्त एक प्रमुख ईव्ही मार्केटच नव्हे तर जागतिक ईव्ही उत्पादन केंद्र बनवावे. ओला एस 1 ची एक्स-शोरूम किंमत 99,999 रुपये आणि ओला एस 1 प्रो ची किंमत 1,29,999 रुपये आहे

ola scooter (pic credit - bhavish kumar twitter)

नुकतीच बाजारात ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर दाखल झाली आहे. पहिल्याच दिवशी या गाडीने जवळजवळ सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. ओलाचे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांनी गुरुवारी सांगितले की ओला इलेक्ट्रिकने पहिल्याच दिवशी त्यांचे मॉडेल एस 1 च्या 600 कोटी रुपयांच्या इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री केली आहे. अग्रवाल यांनी असेही सांगितले की, कंपनी गुरुवारी मध्यरात्रीपासून ओला एस 1 ची विक्री थांबवेल. ओला इलेक्ट्रिकने बुधवारी आपली इलेक्ट्रिक स्कूटर विक्री सुरू केली, जी ओला एस 1 आणि एस 1 प्रो या दोन ट्रिममध्ये येते.

कंपनीने दावा केला आहे की, त्यांनी प्रत्येक सेकंदाला चार OLA S1 इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या आहेत. या व्यतिरिक्त, कंपनीने 86 हजार स्कूटरची विक्री ऑर्डर पार केली आहे,  जो ऑटोमोबाईल उद्योगातील एक ऐतिहासिक विक्रम आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरने अलीकडेच पहिल्या 24 तासांत 100,000 बुकिंगचा विक्रमही ब्रेक केला आहे, ज्यामुळे ती जगातील पहिल्या दिवशी सर्वात जास्त बुक झालेली स्कूटर बनली आहे. ओला इलेक्ट्रिकने 15 जुलैच्या संध्याकाळी आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरचे बुकिंग सुरू केले होते.

अग्रवाल म्हणाले की, भारतात इलेक्ट्रिक स्कूटरला मोठी मागणी आहे आणि अशा गाड्यांसाठी मोठी देशांतर्गत बाजारपेठ आहे. लोकांनी अशा गाड्यांचा लाभ घेऊन भारताला फक्त एक प्रमुख ईव्ही मार्केटच नव्हे तर जागतिक ईव्ही उत्पादन केंद्र बनवावे. ओला एस 1 ची एक्स-शोरूम किंमत 99,999 रुपये आणि ओला एस 1 प्रो ची किंमत 1,29,999 रुपये आहे. फेम 2 सबसिडी आणि राज्य सरकारच्या सबसिडीनंतर दिल्लीत ओला एस 1 ची किंमत 85,009 रुपये आहे. (हेही वाचा: Ola इलेक्ट्रिक स्कूटर कारखाना चालवण्याची संपूर्ण जबाबदारी फक्त महिलांवर; होणार तब्बल 10,000 नोकरभरती)

कंपनी यावर्षी ऑक्टोबरमध्ये 1000 शहरे आणि गावांमध्ये डिलिव्हरी सुरू करेल. ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये पूर्ण एलईडी लाइटिंग पॅकेज आणि 7.0 इंचाचा टच डिस्प्ले आहे, ज्यामध्ये नेव्हिगेशन देखील आहे. डिस्प्लेमध्ये 3-जीबी रॅमसह ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. यात वाय-फाय, ब्लूटूथ आणि 4 जी कनेक्टिव्हिटी असेल.