Ola Electric Launches Gig, S1 Z Sooters: ओला इलेक्ट्रिकने लाँच केली गिग आणि एस1 झेड इलेक्ट्रिक स्कूटर; सुरुवातीची किंमत 39,999 रुपये, आजपासून बुकिंग सुरू

कंपनीने सांगितले की, ही इलेक्ट्रिक स्कूटर 25 किमी/ताशी उच्च गती देते. यामध्ये 1.5 kWh काढता येण्याजोगी बॅटरी, हब मोटर आणि उत्तम ब्रेकिंगसाठी 12-इंच टायर आहेत.

Ola Gig+, Ola S1 Z+ Scooter Images (Photo Credits: Ola Electric Website)

Ola Electric Launches Gig, S1 Z Sooters: देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) मोबिलिटीने मंगळवारी आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर्सची (Electric Scooters) नवीन श्रेणी लॉन्च केली, ज्यामध्ये ओला गिग (Ola Gig) आणि एस1 झेड (S1 Z) सिरीजचा समावेश आहे. या लाइनअपमध्ये चार मॉडेल्सचा समावेश आहे- ओला गिग, ओला गिग+, ओला एस1 झेड आणि ओला एस1 झेड+. या मॉडेल्सच्या किंमती अनुक्रमे 39,999 रुपये, 49,999 रुपये, 59,999 रुपये आणि 64,999 रुपये (एक्स-शोरूम) आहेत. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे  की, ‘या इलेक्ट्रिक स्कूटरच्या नवीन श्रेणीच्या लाँचचे उद्दिष्ट अधिकाधिक लोकांपर्यंत इलेक्ट्रिक मोबिलिटी उपलब्ध करून देणे आहे.’

Ola Gig आणि S1 Z मालिकेचे बुकिंग आजपासून फक्त 499 रुपयांमध्ये सुरू झाले आहे. ओला इलेक्ट्रिकने म्हटले आहे की, ‘स्कूटर्सची ही नवीन श्रेणी टिकाऊ, विश्वासार्ह, परवडणारी आहे. यासोबतच यामध्ये रिमूव्हेबल बॅटरीची सुविधाही देण्यात आली आहे, ज्याद्वारे ही गाडी  ग्रामीण, निमशहरी आणि शहरी ग्राहकांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक गरजा पूर्ण करते. Ola Gig आणि Ola S1 Z मालिकेचे वितरण अनुक्रमे एप्रिल आणि मे 2025 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.

ओला गिगची रचना गिग कामगारांच्या कमी अंतराच्या गरजा लक्षात घेऊन केली गेली आहे. कंपनीने सांगितले की, ही इलेक्ट्रिक स्कूटर 25 किमी/ताशी उच्च गती देते. यामध्ये 1.5 kWh काढता येण्याजोगी बॅटरी, हब मोटर आणि उत्तम ब्रेकिंगसाठी 12-इंच टायर आहेत. ज्यांना जड सामानासह लांबचा प्रवास करावा लागतो, अशा कामगारांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनीने Ola Gig+ स्कूटरची रचना केली आहे. स्कूटरचा टॉप स्पीड 45 किमी/ताशी आहे. या स्कूटरमुळे कामगारांच्या कमाईतही वाढ होण्याची शक्यता असल्याचा दावा कंपनीने केला आहे. (हेही वाचा: Electric Vehicles Rise: 2025 पर्यंत जगभरात 85 दशलक्ष ईव्ही वाहने रस्त्यावर धावणार; भारतात ईव्ही वाहनांची संख्या 5 लाखांवर जाण्याची शक्यता - रिपोर्ट)

कंपनीने Ola S1 Z  ही स्कूटर शहरी प्रवाशांसाठी, विशेषतः तरुण, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन केली आहे. ही  ड्युअल 1.5 kWh काढता येण्याजोग्या बॅटरीसह येते. स्कूटरचा टॉप स्पीड 70 किमी/तास असून, यामध्ये एलसीडी डिस्प्ले आणि 2.9 kW हब मोटर आहे, ज्यामुळे ती फक्त 4.8 सेकंदात 0-40 किमी/ताचा वेग गाठू शकते. Ola S1 Z+ ही दुहेरी-उद्देशाची स्कूटर आहे, जी वैयक्तिक आणि हलक्या व्यावसायिक वापरासाठी डिझाइन केलेली आहे. यात दुहेरी 1.5 kWh काढता येण्याजोग्या बॅटरी आहेत, ही स्कूटर 70 किमी/ताशी उच्च गती देते.