Nitin Gadkari On Diesel Vehicles GST: डिझेल वाहन विक्रीवर 10% GST? नितीन गडकरी यांच्याकडून तातडीने स्पष्टीकरण
त्यासोबतच आम्ही आज संध्याकाळी अर्थमंत्रालयालाही भेटत आहोत. जेणेकरुन ते अधिक प्रमाणात जीएसटी वाढ करतील. ज्यामुळे डिझेल उत्पादक वाहनांमध्ये विक्री घटू शकेल.
10 Percent More GST On Diesel Engine? डिझेल वाहन (Diesel Vehicles) विक्रीवर 10% GST लावण्याबाबत प्रसारमाध्यमांतून वृत्त झळकताच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी तातडीने स्पष्टीकरण दिले आहे. प्रसारमाध्यमांतून आलेल्या वृत्तांचे खंडण करत स्पष्टीकरण देताना त्यांनी म्हटले आहे की, डिझेल वाहनांच्या विक्रीवर अतिरिक्त 10% जीएसटी लागू करण्याबाबतचा असा कोणताही प्रस्ताव सध्या सरकारच्या सक्रिय विचाराधीन नाही.
नितीन गडकरी यांनी आपल्या मुद्द्यांवर जोर देताना स्पष्टीकरणात पुढे म्हटले आहे की, सन 2070 पर्यंत कार्बन नेट झिरो गाठण्यासाठी आणि डिझेल सारख्या घातक इंधनामुळे होणारे वायू प्रदूषण स्तर कमी करण्यासाठी पावले टाकणे आवश्यक आहे. त्यासाठी ऑटोमोबाईल विक्रीतील झपाट्याने वाढ करण्याच्या आमच्या वचनबद्धतेनुसार, स्वच्छ आणि हिरवे पर्यायी इंधन सक्रियपणे स्वीकारणे अत्यावश्यक आहे. ही इंधने आयात पर्यायी, किफायतशीर, स्वदेशी आणि प्रदूषणमुक्त असावीत.
ट्विट
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात काय म्हटले होते?
प्रसारमाध्यमानी वार्तांकन करताना म्हटले होते की, नितीन गडकरी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना अवाहन केले आहे की, त्यांच्या मंत्रालयाने डिझेल इंजिन/वाहनांवर 10 टक्के अतिरिक्त जीएसटी (10% Additional GST on Diesel Vehicles) लागू करावा. डिझेल वाहने टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा हा एकमेव मार्ग असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. जर डिझेल वाहने बंद करायची असतील तर अशा प्रकारची पावले उचलण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. नवी दिल्ली येथे 63 व्या वार्षिक सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या वार्षिक अधिवेशनात बोलत होते.
नितीन गडकरी यांनी आपल्या मुद्द्यांवर जोर देत म्हटले की, डिजेल वाहनांवर 10% अधिकचा जीएसटी लावण्याबद्दल आम्ही आगोदरच एक पत्र तयार केले आहे. त्यासोबतच आम्ही आज संध्याकाळी अर्थमंत्रालयालाही भेटत आहोत. जेणेकरुन ते अधिक प्रमाणात जीएसटी वाढ करतील. ज्यामुळे डिझेल उत्पादक वाहनांमध्ये विक्री घटू शकेल. या वेळी गडकरी यांनी ऑटोमोबाईल कंपन्यांना इशारा दिला की सरकार कर इतके वाढवेल की कंपन्यांना डिझेल वाहने विकणे कठीण होईल. पुढे त्यांनी याच भाषणात काहीसा प्रेमळ मात्र निर्वाणीचा इशारा देत म्हटले की, डिझेल वाहनांचे उत्पादन कमी करा नाहीतर मी करवाढ लागू करेन, असेही प्रसारमाध्यमांनी म्हटले होते. त्यामुळे ऑटो इंडस्ट्रीत एकच खळबळ उडाली. त्यानंतर गडकरी यांनी तातडीने स्पष्टीकरण दिले आहे.
ट्विट
ट्विट
नितीन गडकरी यांनी पुढे सांगितले की, G20 शिखर परिषदेदरम्यान भारत जागतिक जैवइंधन अलायन्समध्ये सहभागी झाला आहे. त्यामुळे जैवइंधनास सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. भारत हा जगभरातील असा देश आहे जो 89 टक्के कच्च्या तेलाची आयात करतो. भविष्यासाठी भारतासमोर हे एक मोठे आव्हान असेल. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी पर्यायी आणि जैवइंधनाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. बस आणि ट्रक अशी वाहने इथेनॉलवर का धावू शकत नाहीत? असा सवालही गडकरी यांनी ऑटो उद्योगाला केला. तसेच यांनी पर्यायी इंधन शोधले आहे त्यांचे कौतुकही केले. मात्र, त्यांच्या घोषणेमुळे ऑटो इंडस्ट्रीमधील शेअर्स मात्र झपाट्याने खाली घसरले. त्यानंतर गडकरींनी स्पष्टीकरण देत भूमिका स्पष्ट केली आहे.