Hyundai Next-Gen Creta, Next-Gen i10: ह्युंदाई लवकर आणणार नवीन क्रेटा, आय10 आणि परवडणारी ईव्ही; लाँचच्या तारखांनी वाढवली उत्सुकता
ह्युंदाई मोटर कंपनीने भारतीय बाजारासाठी आपली नवी रणनीती जाहीर केली असून यामध्ये नेक्स्ट-जनरेशन क्रेटा, नवीन आय१० आणि एका परवडणाऱ्या ए-सेगमेंट इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या लाँचिंगची पुष्टी केली आहे.
प्रमुख वाहन उत्पादक कंपनी ह्युंदाई मोटरने भारतीय बाजारपेठेतील आपला विस्तार वेगाने वाढवण्यासाठी मोठी योजना जाहीर केली आहे. कंपनीने सियोल येथे आयोजित इन्व्हेस्टर डे दरम्यान दिलेल्या माहितीनुसार, भारतात लवकरच नेक्स्ट-जनरेशन क्रेटा, नेक्स्ट-जनरेशन आय१० (i10) आणि एक पूर्णपणे नवीन ए-सेगमेंट इलेक्ट्रिक एसयूव्ही (A-Segment EV) लाँच केली जाणार आहे. कंपनीने २०३० पर्यंत भारतात २६ नवीन मॉडेल्स आणि त्यांचे अपडेट्स आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
ह्युंदाईच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या ताफ्यात परवडणाऱ्या श्रेणीत नवीन ए-सेगमेंट इलेक्ट्रिक एसयूव्ही दाखल होणार आहे. ही ईव्ही २०२६ च्या अखेरच्या तिमाहीत सादर केली जाण्याची शक्यता असून, २०२७ च्या सुरुवातीला ती अधिकृतपणे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल.
तामिळनाडूतील श्रीपेरुंबदूर येथील कारखान्यात स्थानिक पातळीवर तयार होणाऱ्या या कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये ४२ kWh आणि ५१.४ kWh क्षमतेचे बॅटरी पॅक मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये एका चार्जमध्ये ४०० किलोमीटरहून अधिक ड्रायव्हिंग रेंज मिळू शकते. ही ईव्ही बाजारात टाटा पंच ईव्ही आणि महिंद्रा एक्सयूव्ही ३एक्सओ ईव्ही यांसारख्या वाहनांशी थेट स्पर्धा करेल.
नेक्स्ट-जनरेशन क्रेटा २०२७ मध्ये होणार दाखल
भारतीय बाजारात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली मध्यम आकाराची एसयूव्ही 'क्रेटा' आता नवीन अवतारात येण्यासाठी सज्ज होत आहे. नेक्स्ट-जनरेशन क्रेटा २०२७ मध्ये भारतीय रस्त्यांवर धावताना दिसेल.
नवीन क्रेटा के३ (K3) प्लॅटफॉर्मवर आधारित असण्याची शक्यता असून तिची डिझाइन अधिक बोल्ड आणि बॉक्सी असेल. यामध्ये नवीन पॅरामेट्रिक ग्रिल, स्लिम एलईडी हेडलॅम्प्स आणि १८ इंचांचे अलॉय व्हील्स पाहायला मिळतील. इंटिरिअरमध्ये कर्व्हड डिस्प्ले, लेव्हल २ एडीएएस (ADAS) सुरक्षा प्रणाली आणि नवीन इन्फोटेनमेंट इंटरफेस दिला जाईल. विद्यमान पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांसोबतच नवीन क्रेटामध्ये १.५-लिटर स्ट्रॉंग-हायब्रिड इंजिनचा पर्यायही उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे.
नवीन ह्युंदाई आय१० मध्ये मोठे बदल
ह्युंदाईची लोकप्रिय हॅचबॅक आय१० देखील नवीन जनरेशनसह २०२७ च्या अखेरीस किंवा २०२८ पर्यंत लाँच केली जाणार आहे. नवीन आय१० च्या बाह्य रचनेत आणि इंटिरिअरमध्ये मोठे बदल करण्यात येतील.
या कारमध्ये सध्याचे १.२-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आणि सीएनजी पर्याय कायम ठेवले जातील. ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेऊन यामध्ये सीएनजीसोबत ऑटोमॅटिक (AMT) गिअरबॉक्सचा पर्यायही दिला जाऊ शकतो.
भारतात उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर
भारतीय बाजारपेठेतील स्थान अधिक बळकट करण्यासाठी कंपनीने उत्पादन क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ह्युंदाई आपल्या स्थानिक उत्पादन क्षमतेत वार्षिक ३.२ लाख युनिट्सची वाढ करणार असून, यामुळे एकूण क्षमता वार्षिक सुमारे १४.२ लाख युनिट्सपर्यंत पोहोचेल. स्थानिक पातळीवर ९० टक्क्यांहून अधिक सुटे भाग वापरून भारताला आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेसारख्या जागतिक बाजारपेठांसाठी एक प्रमुख निर्यात केंद्र बनवण्याचे नियोजन आहे.