BattRE ने सादर केली वजनाने सर्वात हलकी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावेल 90 किमी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
ही इलेक्ट्रिक स्कूटर सध्या पाच रंगामध्ये उपलब्ध आहे.
इंधनांच्या वाढत्या किमती, प्रदूषण यामुळे सरकार इलेक्ट्रिक वाहनांवर (Electric vehicle) भर देताना दिसून येत आहे. सध्या रस्त्यावर अशी काही वाहने चालतानाही दिसत आहे. अशात जयपूरची स्टार्टअप कंपनी BattRE ने नवी इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहे. याची किंमत फक्त 63,555 रुपये इतकी आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही इलेक्ट्रिक स्कूटर तब्बल 90 किमी पर्यंत चालते. ही इलेक्ट्रिक स्कूटर सध्या पाच रंगामध्ये उपलब्ध आहे.
स्कूटरच्या फ्रंट अॅप्रनवर एलईडी हेडलाइट दिलेला आहे. टेल लॅम्प आणि इंडिकेटर्स सुद्धा एलईडी आहेत. गोल हेडलॅम्प आणि रीअर व्ह्यू मिरर्स स्कूटरला रेट्रो लुक देतात. याव्यतिरिक्त स्कूटरमध्ये हॅन्डलबारवर ब्लॅक फ्लाई स्क्रीन, डिजिटल इंस्ट्रूमेंट कन्सोल, किलेस इग्निशन, अँटी थेफ्ट अलार्म सिस्टम आणि यूएसबी चार्जर असे फीचर्स आहेत. याचा इंस्ट्रूमेंट कन्सोल एलसीडी आहे, ज्यावर बॅटरीचा वापर, वेग, तापमान, ऑडोमीटर आणि स्कूटरमध्ये असलेल्या त्रुटी संबंधित माहिती मिळते.
वापरकर्त्यांच्या सोयीसाठी स्कूटरच्या फ्रंट अॅप्रनच्या मागे एक बॉटल होल्डर देण्यात आला आहे. यात सीटच्या खाली स्टोरेजची अतिरिक्त जागा आहे. स्कूटर मध्ये 10-इंचाचे अलॉय चाके आणि ट्यूबलेस टायर आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटरचा ग्राउंड क्लियरंस 150 मिमी आहे आणि याचा टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रति तास आहे. स्कूटर च्या समोर आणि रियर, अशा दोन्ही बाजूला डिस्क ब्रेक दिले आहेत.
सर्वात हलकी इलेक्ट्रिक स्कूटर -
BattRE च्या या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 48V 30 Ah लिथियम आयर्न बॅटरी पॅक दिला आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही बॅटरी 90 किलोमीटरपर्यंत चालेल. या बॅटरीचे वजन फक्त 12 किलोग्रॅम आहे तर, संपूर्ण स्कूटरचे वजन वजन केवळ 64 किलोग्रॅम आहे. सध्या भारतात उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरपैकी ही सर्वात हलकी स्कूटर आहे. (हेही वाचा: आता ना टायर पंक्चर होण्याची भीती, ना हवा भरण्याची कटकट; कारण बाजारात येत आहे Airless Tires)
पूर्ण चार्ज झाल्यावर ऑटोमॅटीक बंद होते –
या स्कूटरमध्ये एक स्वयंचलित कट ऑफ मॅकेनिझम आहे, जे बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यानंतर पॉवर कट ऑफ करते. सध्या तरी या स्कूटरला कुठलेही नाव दिले नाही, परंतु याला ई-स्कूटर म्हटले जात आहे. सध्या ही स्कूटर फक्त नागपूर, हैदराबाद, अनंतपुर आणि कुरनूलसारख्या शहरांमध्ये उपलब्ध आहे. जून अखेरीस पुणे, विशाखापट्टणम आणि वरंगल मध्ये डीलरशिप आणि सेवा केंद्र उघडले जातील.