Avan Motors ने बाजारात आणली दोन बॅटरींची नवी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावणार 110 किमी
ही स्कूटर दोन बॅटरी पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. अवघ्या 2 ते 4 तासांमध्ये ही गाडी तुम्ही चार्ज करू शकता.
देशात पेट्रोल आणि डीझेलचे भाव गगनाला भिडत असलेले दिसत आहेत. सोबत अशा इंधनामुळे प्रदूषणाचा फटका बसतो तो वेगळा. यावर उपाय म्हणून कंपन्या इलेक्ट्रिक वाहन निर्मितीवर भर देताना दिसून येत आहेत. नुकतीच अवन मोटर्स (Avan Motors) ने ट्रेंड इ (Trend E) ही इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. ही स्कूटर दोन बॅटरी पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. अवघ्या 2 ते 4 तासांमध्ये ही गाडी तुम्ही चार्ज करू शकता. एकदा चार्ज झाल्यावर सिंगल बॅटरीसह तुम्ही जवळजवळ 60 किमी अंतर कापू शकाल. तर दोन बॅटरींची स्कूटर 110 किमीचे अंतर कापू शकणार आहे.
या गाडीच्या एका बॅटरीच्या मॉडेलची किंमत 56,900 रुपये तर दोन बॅटरी असलेल्या मॉडेलची किंमत 81,269 रुपये असणार आहे. 1,100 इतके रुपये भरून तुम्ही ही गाडी बुक करू शकता. सध्या ही स्कूटर रेड-ब्लॅक, ब्लॅक रेड, व्हाईट ब्ल्यू अशा रंगांमध्ये उपलब्ध आहे. या गाडीचा टॉप स्पीड 45 kmph इतका आहे. (हेही वाचा: चीनने लॉंंच केली एकदा चार्ज केल्यावर तब्बल 312 किलोमीटर धावणारी इलेक्ट्रिक कार)
या नव्या ट्रेंड ई मध्ये हायड्रॉलिक टेलेस्कॉपिक फ्रंट सस्पेंशन आणि एक कोयल स्प्रिंग रीयर सस्पेंशन दिली आहे. ब्रेकिंगसाठी स्कूटरच्या समोर मेन् डिस्क ब्रेक आणि रीयर मध्ये ड्रम ब्रेक दिला गेला आहे. ही स्कूटर 150 केजी वजन उचलू शकते असा दावा कंपनीने केला आहे.
इतर सुविधा –
मागे बसणाऱ्यासाठी छोटे बॅकरेस्ट, सीटच्या आत आणि पुढील बाजुला वस्तू ठेवण्यासाठी जागा, बॉटल होल्डर आहेत. शिवाय इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये 'स्मार्ट की' फिचर देण्यात आले आहे, जे कारसारखी लॉकची सुविधा देते. याच सोबत कंपनी इलेक्ट्रिक बाईकवरही काम करत आहे, जी पुढच्या वर्षी बाजारात येईल.