World's Richest Nation: अमेरिकेला मागे टाकत चीन बनला जगातील सर्वात श्रीमंत देश; जाणून घ्या किती आहे संपत्ती

या देशांमध्ये जगातिक एकूण संपत्तीपैकी 60 टक्क्यांहून अधिक संपत्ती आहे. यामध्ये चीन, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जपान, मेक्सिको आणि स्वीडन यांचा समावेश आहे.

China Flag (Photo Credits-Twitter)

जगातील महासत्ता मानल्या जाणाऱ्या अमेरिकेला (US) मागे टाकत आता चीन (China) जगातील सर्वात श्रीमंत देश (Richest Country) बनला आहे. जगभरातील देशांच्या ताळेबंदाचा मागोवा घेणाऱ्या व्यवस्थापन सल्लागार मॅकिन्से अँड कंपनीच्या संशोधन शाखेच्या अहवालानुसार, गेल्या 20 वर्षांत जगातील संपत्ती तीन पटीने वाढली आहे. पण या वाढीमध्ये चीनचा वाटा सुमारे एक तृतीयांश आहे, म्हणजे सुमारे 33% आहे.  म्हणजेच चीनच्या संपत्तीत सुमारे 16 पट वाढ झाली आहे. अहवालानुसार, 2000 साली जगाची एकूण संपत्ती $156 ट्रिलियन होती, जी 2 दशकांनंतर म्हणजेच 2020 नंतर $514 ट्रिलियन झाली.

2000 मध्ये चीनची एकूण संपत्ती $ 7 ट्रिलियन होती, जी 2020 मध्ये वेगाने वाढून $ 120 ट्रिलियन झाली आहे. गेल्या 20 वर्षांत अमेरिकेची संपत्ती दुपटीहून अधिक वाढली आहे. 2020 मध्ये अमेरिकेची संपत्ती 90 ट्रिलियन डॉलरवर पोहोचली आहे. या अहवालात असे म्हटले आहे की, अमेरिकेतील मालमत्तेच्या किमतीत फारशी वाढ न झाल्यामुळे अमेरिकेची संपत्ती चीनपेक्षा कमी राहिली आणि त्यांनी आपले पहिले स्थान गमावले.

चीन आणि अमेरिकेच्या संपत्तीचा मोठा हिस्सा फक्त काहीच श्रीमंत लोकांपर्यंतच मर्यादित असल्याचे या अहवालात म्हटले आहे. अहवालानुसार, या दोन देशांमध्ये 10% लोकसंख्येकडेच सर्वाधिक संपत्ती आहे. अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की या देशांमध्ये श्रीमंतांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे श्रीमंत आणि गरीब यांमध्ये मोठी दरी निर्माण होता आहे. अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की एकूण जागतिक संपत्तीपैकी 68% संपत्ती रिअल इस्टेटच्या रूपात अस्तित्वात आहे, तर उर्वरित संपत्तीमध्ये पायाभूत सुविधा, यंत्रसामग्री आणि उपकरणे यांचा समावेश आहे. (हेही वाचा: Cities to be Submerged: पुढील 9 वर्षात जगातील 9 मोठी शहरे बुडण्याच्या धोका; भारतामधील 'या' शहराचा समावेश)

जगातील 10 देशांच्या ताळेबंदाच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या देशांमध्ये जगातिक एकूण संपत्तीपैकी 60 टक्क्यांहून अधिक संपत्ती आहे. यामध्ये चीन, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जपान, मेक्सिको आणि स्वीडन यांचा समावेश आहे. दरम्यान, क्रेडिट स्विसच्या ग्लोबल वेल्थ रिपोर्टनुसार, भारताची एकूण संपत्ती ऑक्टोबर 2019 मध्ये $12.6 ट्रिलियन होती. जी चीनच्या $120 ट्रिलियनच्या एकूण संपत्तीच्या 8 पट कमी आहे.