कोविड-19 उत्पत्तीचा शोध घेण्यासाठी WHO आंतरराष्ट्रीय टीम चीन ला पाठवणार- Report
AFP संस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
कोविड-19 (Covid-19) उत्पत्तीचा शोध घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय टीम जानेवारी महिन्यात चीनला (China) दाखल होणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) म्हटले आहे. AFP संस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. या वर्षी मे महिन्यात World Health Assembly च्या झालेल्या वार्षिक मिटिंगमध्ये कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) उत्पत्तीची शोध घेण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. या ठरावाला चीनने देखील पाठिंबा दर्शवला होता. (Coronavirus: WHO ची मोठी घोषणा; कोरोनावर देण्यात येणाऱ्या औषधांच्या यादीतून Remdesivir बाद)
WHA ही जिनिव्हा येथील WHO ची निर्णय घेणारी संस्था आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या टीमने चीनला भेट देऊन कोविड-19 विषयी माहिती मिळवावी, असे जगभरातील अनेक देशांनी एप्रिल मध्ये म्हटले होते. तसंच या विषयी अधिक माहिती समोर आणण्यासही सांगितले होते.
दरम्यान, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी फेब्रुवारी मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने आंतरराष्ट्रीय तज्ञांना चीनला पाठवले होते. कोविड-19 चा पहिला रुग्ण चीन मधील वुहान प्रांतात सापडला होता. 17 नोव्हेंबर 2019 रोजी वुहान मधील 55 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. (विमान प्रवासात कोविड-19 संसर्गाचा धोका किती? जाणून घ्या, WHO चे मत)
वर्षभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला वेठीस धरले आणि ही महामारी असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने केली. आतापर्यंत जगभरात 72.8 मिलियन लोकांना कोरोनाची लागण झाली असून 1.62 मिलियन हून अधिक लोकांचा यात जीव गेला आहे, अशी माहिती जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या कोविड-19 संकटावर मात करण्यासाठी लसी विकसित करण्यात आल्या आहेत. काही देशांमध्ये लसीकरणाला देखील सुरुवात झाली आहे. लवकरच भारतातही लसींना मंजूरी मिळून लसीकरण मोहिम सुरु होईल, अशी आशा आहे. विशेष म्हणजे जानेवारी 2021 पासून लसीकरणाला सुरुवात होऊन ऑक्टोबरपर्यंत जनजीवन पूर्वपदावर येण्याचा अंदाज सीरम इंस्टिट्यूडचे सीईओ अदर पूनावाला यांनी वर्तवला आहे.