What is Hikikomori? जपानमधील 1.5 दशलक्ष लोक 'हिकिकोमोरी'चे शिकार, जगत आहेत एकाकी जीवन; जाणून घ्या काय आहे ही स्थिती
सध्याच्या व्यापक सामाजिक-सांस्कृतिक परिस्थितीतून निर्माण झालेली हिकिकोमोरी ही एक नवीन स्थिती आहे का? याचा विचार करण्याचे महत्त्व काही मानसशास्त्रज्ञांनी नोंदवले आहे. यातील बराचसा विचार सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या प्रभावावर केंद्रित आहे.
तुम्ही स्वतःसाठी अशा आयुष्याचा विचार करू शकता का, जिथे वर्षानुवर्षे तुमच्यासोबत कोणीही नाही. कुटुंबापासून दूर अशा ठिकाणी तुम्ही फक्त एकटे राहत आहात. तुम्ही स्वतःला सर्वांपासून वेगळे केले आहे, नाही ना?, पण हे जपानमध्ये (Japan) घडत आहे. इथले लोक स्वतःला एका खोलीत बंद करून जगापासून एकटे राहत आहेत. त्यांच्यासाठी त्यांचे जग फक्त इंटरनेट सर्फिंगपुरतेच मर्यादित राहिले आहे. जपानमधील काम करणा-या वयोगटातील साधारण 1.5 दशलक्ष लोक एकाकी जीवन जगत असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. याला हिकिकोमोरी (Hikikomori) म्हणून ओळखले जाते.
बीबीसीच्या म्हणण्यानुसार, हिकिकोमोरी हा शब्द जपानी मानसशास्त्रज्ञ तामाकी सायटो (Tamaki Saito)यांनी त्यांच्या 1998 च्या 'सोशल विथड्रॉवल - अॅडोलेसेन्स विदाऊट एंड' या पुस्तकात तयार केला होता. एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका नुसार, जेव्हा एखादी व्यक्ती कमीतकमी सहा महिने समाजापासून दूर एकाकी जीवन जगते तेव्हा हिकिकोमोरीचे निदान केले जाते. हिकिकोमोरीचा त्रास असलेली व्यक्ती कोणत्याही कारणास्तव आपल्या खोलीबाहेर पडण्यास टाळाटाळ करते.
जपानमधील 2010 च्या अभ्यासात असे आढळून आले की, जपानी लोकसंख्येपैकी 1.2 टक्के लोक (20 ते 49 वयोगटातील) हिकिकोमोरीचा अनुभव घेत होते. सध्या तरी ही गोष्ट मानसिक आजार म्हणून वर्गीकृत केलेली नसली तरी, हिकिकोमोरी अनेकदा त्याच वेळी उद्भवते जेव्हा एखाद्या व्यक्तीला मानसिक आजाराचे निदान होते. हिकिकोमोरीचे अजूनतरी ठोस कारण समोर आले नाही, मात्र अनेक प्रॅक्टिशनर्सने नोंदवले आहे की, जीवनातील तणावपूर्ण घटनेनंतर रूग्ण हिकिकोमोरी बनतात. काही अभ्यास असे सूचित करतात की देशातील विस्कळीत कुटुंबपद्धती हे देखील एक कारण असावे. (हेही वाचा: Stress Management During Layoffs: नोकरी गेली तर? घाबरू नका, स्वतःला सावरा; मानसिक संतुलनासाठी करा ताण-तणाव व्यवस्थापन)
सध्याच्या व्यापक सामाजिक-सांस्कृतिक परिस्थितीतून निर्माण झालेली हिकिकोमोरी ही एक नवीन स्थिती आहे का? याचा विचार करण्याचे महत्त्व काही मानसशास्त्रज्ञांनी नोंदवले आहे. यातील बराचसा विचार सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या प्रभावावर केंद्रित आहे. हिकिकोमोरी इंटरनेट व्यसनासह उद्भवू शकते. दरम्यान, हिकिकोमोरीवरील उपचार हे औषधांवर आधारित नसून सामान्यतः मानसोपचारात्मक असतात. जपानच्या हिकिकोमोरी तज्ञांपैकी एक, डॉ. ताकाहिरो काटो, जे स्वतः विद्यार्थी जीवनात हिकिकोमोरीचे बळी ठरले होते, आता ते हा आजार थांबवण्याचे काम करत आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Apr 06, 2023 09:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

